Corona Virus: मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांसाठी पुढील ३-४ आठवडे चिंता वाढविणारे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 05:59 AM2022-01-07T05:59:07+5:302022-01-07T05:59:20+5:30
तज्ज्ञांचे मत, सुरुवातीला झपाट्याने वाढणार रुग्णसंख्या. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये ओमायक्राॅनच्या १० पैकी एकाच रुग्णामध्ये लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे जास्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील २४ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये अडीच हजारांहून अधिक ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये अतिशय झपाट्याने काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून पुढील ३ ते ४ आठवडे महानगरांची चिंता वाढविणारे राहणार आहेत. त्यानंतर मात्र रुग्णांच्या संख्येत घट दिसून येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये ओमायक्राॅनच्या १० पैकी एकाच रुग्णामध्ये लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे जास्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही.
मात्र, ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना जास्त धाेका राहणार आहे. महानगरांमध्ये लाट ओसरू लागताच छाेट्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. सुरुवातीला अतिशय झपाट्याने रुग्णसंख्या वाढते, असा ओमायक्राॅनचा पॅटर्न आहे.
डेल्टा व्हेरिएंटने आणलेल्या लाटेच्या तुलनेत देशभरात सध्या जास्त सज्जता आहे. राज्यांना १.१४ लाख ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स पुरविण्यात येत आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठीही उपाययाेजना करण्यात येत आहेत. विषाणू सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे ओमायक्राॅनशी लढण्यासाठी लाॅकडाउनचा काहीही उपयाेग नाही.
दिल्लीत सध्या लाॅकडाऊन नाही
दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये काेराेनाचे तब्बल १५ हजार ९७ नवे रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर दिल्लीत रात्रीची संचारबंदी, शनिवार आणि रविवारी संपूर्ण संचारबंदीसह काही निर्बंध लावण्यात आले आहेत.
रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले बेड्स, आयसीयूतील उपलब्धता त्यामुळे सध्या लाॅकडाउन लावण्याची गरज नसल्याचे दिल्लीचे आराेग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.
राज्यात माेठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. मात्र, हे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इटलीतून आलेले १२५ प्रवासी काेराेना पाॅझिटिव्ह
पंजाबच्या अमृतसर विमानतळावर इटलीहून दाखल झालेल्या एका खासगी विमानातील १२५ प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी याबाबत माहिती दिली.
विमानात १७९ प्रवासी होते. पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना अमृतसरमधील रुग्णालयांमध्ये संस्थात्मक विलगीकरणासाठी पाठवले जाणार आहे. सर्व प्रवाशांची इटलीमध्ये कोविड टेस्ट निगेटिव्ह आली हाेती. मात्र, नियमानुसार त्यांची भारतात दाखल झाल्यावर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.
अमृतसर येथे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रवाशांनी शंका उपस्थित केली.
आपल्याला साेडून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी प्रवाशांनी केल्यामुळे विमानतळावर काही काळ तणाव निर्माण झाला हाेता.