सावधान ! तुमच्या पिण्याच्या पाण्यात आहेत प्लास्टिकचे कण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 09:13 AM2018-03-16T09:13:04+5:302018-03-16T10:44:34+5:30
बाटलीबंद पाण्यात शरीरास घातक व हानिकारक अशी तत्त्व आढळली आहेत. वेळीच व्हा सावध.
न्यू-यॉर्क - पाणी हे जीवन आहे. याशिवाय कोणत्याही जीवप्राण्याला जगता येणं अशक्य आहे. प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी आपल्याला पाण्याची गरज भासते. मात्र, घरातून स्वच्छ पाण्याची बाटली नेहमीच स्वतःसोबत नेणे शक्य नसते. त्यामुळे ब-याचदा अनेकांना बाटलीबंद पाणी प्यावे लागते. प्रवासात असो किंवा येण्या-जाण्याच्या वेळेत झटकन तहान भागवण्यासाठी आपण पाण्याची बाटली खरेदी करतो. मोठ-मोठ्याला ब्रॅण्ड अंतर्गत बाटलीबंद पाण्याची विक्री होत असल्यानं प्यायलेलं पाणी स्वच्छच असणार, यावर आपल्याला खात्री असते.
मात्र अमेरिकी स्टडीनं बाटलीबंद पाण्याबाबत केलेल्या अभ्यासानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती समजल्यानंतर तुम्ही बाटलीबंद पाणी पिण्यापूर्वी 10 वेळा नाही तर 100 वेळा विचार कराल हे नक्की. बाटली बंद पाण्यामध्ये तब्बल 90 टक्के प्लास्टिकचे सूक्ष्म कण आणि शरीरास हानिकारक अशी तत्त्वं आढळली आहेत, असा दावा अमेरिकी स्टडीनं केला आहे. जागतिक स्तरावरील ज्या ब्रॅण्डचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यामध्ये एक्वाफिना आणि बिसलरी या नामांकित ब्रॅण्ड्सचाही समावेश आहे. भारतासहीत जगातील अनेक देशांमध्ये बाटलीबंद पाणी उपलब्ध करणा-या कंपन्यांमधील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू-यॉर्कमधील संशोधनकर्त्यांनी अमेरिकेत वेगवेगळ्या 27 ठिकाणांहून मागवलेल्या 259 पाण्याच्या बाटल्यांची तपासणी केली. भारतातील नवी दिल्ली, चेन्नई, मुंबईतील देखील नमुन्यांची तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या या बाटलीबंद पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीत तब्बल 90 टक्क्यांहून अधिक प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आलेत.
भारत, ब्राझिल, चीन, इंडोनेशिया, केनिया, लेबेनॉन, मेक्सिको, थायलँड आणि अमेरिका या देशांतील बाटलीबंद पाण्याचे नमुने तपासणीसाठी मागवण्यात आले होते. संशोधनकर्त्यांनी केलेल्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये एक लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये प्लास्टिकचे सरासरी 10.4 प्रमाणात सूक्ष्म कण आढळले. यापूर्वी नळातून येणा-या पाण्याचीही तपासणी करण्यात आली होती. त्या तुलनेत बाटलीबंद पाण्यामध्ये आढळलेले प्लास्टिकचं प्रमाण 2 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती संशोधनकर्त्यांनी दिली आहे.
सावधान ! तुम्ही पित आहात प्लास्टिकचे 10 हजार सूक्ष्म कण
ज्या व्यक्ती दिवसभरात एक लिटर बाटलीबंद पाणी पितात, त्यांच्या पोटात वर्षभरात तब्बल प्लास्टिकचे 10 हजारांपर्यंत सूक्ष्म कण जातात, अशी धक्कादायक माहितीदेखील या अभ्यासाद्वारे समोर आली आहे. दरम्यान, या सर्वांचा मानवी शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात, याबाबतची निश्चित स्वरुपातील माहिती अद्यापपर्यंत संशोधनकर्त्यांनी दिलेली नाही. दरम्यान, बाटलीबंद पाण्यातील अदृश्य प्लास्टिक कण पाहण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला होता. या अभ्यासात पाण्यामध्ये 100 मायक्रॉन व 6.5 मायक्रॉन आकाराचे दुषित कण आढळून आले. त्यामुळे, प्रवासात येता-जाता तुम्ही बाटलीबंद पाण्याचं सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण त्यातील दुषित कणांमुळे आरोग्यावर दुष्पपरिणाम होण्याचा धोका आहे.