मायक्रोसॉफ्टने जगणे केले हार्ड; अनेक देशांमधील विमानसेवा, बॅंका, एटीएम, रुग्णसेवेला माेठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 05:39 AM2024-07-20T05:39:13+5:302024-07-20T05:40:09+5:30

अपडेटने केले आऊटडेटेड : सिस्टीम अपडेट केल्यामुळे मायक्राेसाॅफ्टच्या क्लाऊड सर्व्हरमध्ये बिघाड

Microsoft Airlines, banks, ATMs, patient services in many countries have been hit hard | मायक्रोसॉफ्टने जगणे केले हार्ड; अनेक देशांमधील विमानसेवा, बॅंका, एटीएम, रुग्णसेवेला माेठा फटका

मायक्रोसॉफ्टने जगणे केले हार्ड; अनेक देशांमधील विमानसेवा, बॅंका, एटीएम, रुग्णसेवेला माेठा फटका

नवी दिल्ली : जगासाठी शुक्रवार डाेकेदुखीचा ठरला. ज्यांनी सकाळी कामाला सुरूवात केली, त्यांचे संगणक किंवा लॅपटाॅप चालेनात. काेट्यवधी लाेकांना फटका बसला. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत लाेक त्रस्त झाले. जगभरातील विमान कंपन्या, बॅंका, रुग्णालये, टीव्ही प्रसारण तसेच अनेक कंपन्यांचे कामकाज अनेक तासांसाठी बंद पडले. अन् याचे कारण हाेते मायक्राेसाॅफ्टच्या सर्व्हरमध्ये निर्माण झालेला मोठा तांत्रिक बिघाड...

मायक्राेसाॅफ्ट वापरणाऱ्यांचे संगणक अचानक क्रॅश झाले. स्क्रीन निळ्या रंगाची झाली. काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असून, संगणक रिस्टार्ट करत आहाेत, असा मेसेज झळकू लागला. सर्वांचे संगणक रिस्टार्ट व्हायला लागले. मात्र, त्यासाठी प्रचंड वेळ लागत हाेता. काहींचे संगणक बंद झाले. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट यंत्रणांवर परिणाम झाला.

‘डाऊनडिटेक्टर’ या वेबसाइटने सांगितले की, व्हिसा, एडीटी सिक्युरिटी, ॲमेझाॅन व अमेरिकेच्या अनेक विमान सेवांवर परिणाम झाला. ऑस्ट्रेलियात विमान कंपन्या, दूरसंचार सेवा पुरवठादार, बॅंकांमध्ये संगणक बंद पडले. त्यामुळे या सेवा बंद पडल्या.

विमाने जमिनीवरच राहिली : भारतात विमानतळांवर समस्या निर्माण झाली. अनेक विमानतळांवर चेक इन प्रक्रिया ठप्प पडली. अनेक कंपन्यांच्या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. विमानांचे उड्डाण हाेऊ न शकल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अमेरिकेत अनेक कंपन्यांनी सर्व उड्डाणे काही तासांसाठी राेखली. युराेपमधील विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानसेवेत विलंब हाेण्याची सूचना पाठविली. - संबंधित वृत्त/देशविदेश

हा सायबर हल्ला नाही : क्राऊडस्ट्राइक

ज्या क्राऊडस्ट्राइकच्या अपडेटमुळे संगणक बंद पडले, त्या संस्थेने हा प्रकार सायबर हल्ल्याचा नाही, असे स्पष्ट केले. क्राऊडस्ट्राइकचे सीईओ जाॅर्ज कर्ट्झ यांनी ‘एक्स’वर पाेस्ट करू सांगितले की, हा सुरक्षेशी संबंधित किंवा सायबर अटॅक नाही. अपडेटमुळे झालेल्या बिघाडावर ताेडगा काढण्यात आला असून, ताे साेडविण्यात येत आहे.

यंत्रणा कार्यरत करू, उद्याेगजगताच्या संपर्कात

या समस्येबाबत आम्हाला जाणीव असून ग्राहकांना तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य करून त्यांच्या यंत्रणा कार्यरत करण्यासाठी आम्ही क्राऊडस्ट्राइक तसेच उद्याेगजगताच्या संपर्कात आहाेत.

- सत्या नाडेला, सीईओ, मायक्राेसाॅफ्ट

कुठे, कधी, काय?

सकाळी १०:०० क्राऊडस्ट्राइकची यंत्रणा ठप्प पडली.

सकाळी १०:४०  विमानतळांवरील

सेवा विस्कळीत.

सकाळी १०:५०

दिल्ली विमानतळावर

गेट स्क्रिन अचानक

बंद. उड्डाणे राेखली.

दुपारी १:३० 

ब्रिटनमध्ये स्काय

न्यूजचे प्रसारण बंद.

दुपारी १:३७  ऑस्ट्रेलियात दूरसंचार

सेवांवर परिणाम.

दुपारी २:१५  

इंडियन काॅम्प्यूटर

इमरजन्सी रिस्पाॅन्स

टीमने तात्पुरता

ताेडगा सांगितला.

दुपारी ३

क्राऊडस्ट्राइक म्हणाले, सायबर हल्ला नाही.

ताेडगा शाेधला आहे.

सायंकाळी ७:१५

अमेरिकन एअरलाईन्सची सेवा सुरू झाली.

सायंकाळी ७:३०

लंडन शेअर बाजाराचे व्यवहार सुरळीत.

नेमके काय झाले?

मायक्राेसाॅफ्टने ‘क्राऊडस्ट्राइक’ या सायबर सिक्युरिटी प्लॅटफाॅर्मची नवी अपडेट रिलीज केली. त्यातील फाल्कन सेन्सरमध्ये त्रुटी राहिली. त्यामुळे मायक्राेसाॅफ्ट अझ्युअर व मायक्राेसाॅफ्ट ३६५ या सेवा बंद पडल्या. अझ्युअर हा क्लाऊड काॅम्प्युटिंग प्लॅटफाॅर्म आहे. यातून विविध अप्लिकेशन तसेच सेवांचे व्यवस्थापन केले जाते. तेच बंद पडल्यामुळे फटका बसला.

किती काळ हीच स्थिती?

क्राऊडस्ट्राइकने ताेडगा दिला आहे; परंतु यंत्रणा पूर्ववत हाेण्यास बराच वेळ लागू शकताे. प्रत्येक संगणक स्वतंत्रपणे दुरुस्त करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक दिवस किंवा काही आठवडे लागू शकतात.

आव्हान काय?

बंद पडलेल्या संगणकांमध्ये सुधारित साॅफ्टवेअर इन्स्टाॅल करणे त्रासदायक ठरू शकते. डेटा गमावण्याची भीती आहे. ताे डेटा पुन्हा मिळविणे कठीण काम आहे.

पहिलं आयटी संकट; यातून नव्या मार्गदर्शक सूचना येतील

डिजिटल युग सुरू झाल्यानंतरचे हे पहिले आणि भयानक आयटी संकट आहे. हा सायबर ॲटॅक नाही. विमानतळांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. बँका बंद, व्यवहार बंद, रुग्णालयांपासून ते रेल्वे, मेट्रोपर्यंत सगळं काही ठप्प झाले. फक्त त्याचे मोजमाप आत्ता लगेच करता येणार नाही आणि या संकटासाठी कोणालाही जबाबदार धरता येणार नाही. त्यामुळे नुकसानभरपाई द्यायची काेणी हादेखील प्रश्न आहे. त्यामुळे आता यावर उपाय म्हणून कदाचित नव्याने अशा संकटावेळी जबाबदारी निश्चितीपासून, नुकसान भरपाईपर्यंतच्या नव्या मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या जातील, असे वाटते.

भारत सरकारने केला मायक्राेसाॅफ्टला संपर्क

माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘एक्स’वर पाेस्ट करून सांगितले की, या ग्लाेबल आऊटेजबाबत मायक्राेसाॅफ्टवर सहयाेगी कंपन्यांना संपर्क केला आहे. समस्येचे कारण शाेधण्यात आले असून, ती साेडविण्यासाठी नवे अपडेट्स रिलीज करण्यात येत आहेत.

Web Title: Microsoft Airlines, banks, ATMs, patient services in many countries have been hit hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.