"लसीची उत्पादन क्षमता, नेतृत्व कमालीचं"; बिल गेट्स यांच्याकडून भारताचं कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 01:23 PM2021-01-05T13:23:14+5:302021-01-05T13:26:49+5:30
दोन दिवसांपूर्वी डीसीजीएनं सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपात्कालिन वापरास दिली होती परवानगी
देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तर धोका अद्यापही टळलेला नाही. अशा परिस्थितीत दोन दिवसांपूर्वी भारतानंभारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड या लसींच्या आपात्कालिन वापरांसाठी परवानगी दिली. भारताच्या या निर्णयानंतर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारताच्या लस निर्मितीतील भारताच्या नेतृत्वाचं, वैज्ञानिकांच्या कामगिरीचं आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उत्पादनाच्या क्षमतेचं कौतुक केलं आहे.
भारतात दोन लसींच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर पुढील आठवड्यापासून लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवात केली जाऊ शकते. लसीकरणाच्या व्यापक मोहिमेपूर्वी देशात याचं ड्राय रनही करण्यात आलं. दरम्यान, देशात लसींच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर बिल गेट्स यांनी कौतुक केलं. "संपूर्ण जग करोना महासाथ संपविण्याचे प्रयत्न करत असताना वैज्ञानिकांचे नाविन्यपूर्ण संशोधन आणि लस निर्मितीच्या क्षमतेत भारताचं नेतृत्व पाहणं फार चांगलं आहे." असं बिल गेट्स म्हणाले.
गेट्स यांनी व्यक्त केली होती चिंता
यापूर्वी बिल गेट्स यांनी करोना महासाथीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसंच यापुढील काळात अधिक सतर्क राहण्याचं आवाहनही केलं होतं. लसींना मिळत असलेली मान्यता पाहता परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. परंतु हे वाटतं तितकं सोपं नाही. नव्या वर्षाचा पहिला महिना आव्हानात्मक सिद्ध होऊ शकतो. नव्या स्ट्रेनवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या क्षमतेनं काम होमं आवश्यक असल्याचंही मत बिल गेट्स यांनी व्यक्त केलं होतं.
"गेले वर्षभर मी आणि माझी पत्नी मेलिंडा आम्ही दोघेही जगभरातील धोरणकर्ते, वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांच्या सतत संपर्कात आहोत. या वर्षभरात मानवाने साधलेली वैज्ञानिक प्रगती स्तिमित करणारी आहे. जेमतेम १२ महिन्यांच्या काळात एका संपूर्ण अपरिचित विषाणूबाबत जगाने घेतलेली झेप मानवी इतिहासात अभूतपूर्व अशीच आहे. एरवी एखादी लस विकसित करण्यासाठी किमान दहा वर्षे जावी लागतात. यावेळी एक वर्षापेक्षा कमी काळात अनेक लसी विकसित करण्यात आल्या. अर्थात, धोका अजूनही टळलेला नाही. संगणकाच्या मदतीने निर्मिलेली प्रारूपे दर्शवतात की, येत्या काही महिन्यांत महामारी अधिक विराट स्वरूप धारण करू शकते. शिवाय नव्याने आढळलेल्या कोरोनाच्या उत्परिवर्तनाचाही अभ्यास करावा लागेल," असंही ते म्हणाले होते.
आपल्याला आश्वस्त करणारी दोन कारणे आहेत. एक- मास्क, शारीरिक अंतर आणि अन्य सुरक्षात्मक उपाययोजनेद्वारे विषाणूला अटकाव करून प्राण वाचवता येतात, हे सिद्ध झालं आहे आणि दुसरे म्हणजे ज्याबद्दल आतापर्यंत आपण ऐकत वा वाचत होतो त्या लसी आणि उपचार पद्धती नववर्षात प्रत्यक्षात उपलब्ध होणार आहेत. किमानपक्षी प्रगत देशात यांचा परिणाम दिसून येईल, रुग्णांची आणि मृत्यूची संख्या झपाट्याने कमी होईल, असा विश्वासही त्यांनी यापूर्वी व्यक्त केला होता.