१० कोटी शाळकरी मुलांसाठी माध्यान्ह भोजन; सरकारला हजारो कोटींचा अतिरिक्त खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 01:39 AM2018-09-08T01:39:02+5:302018-09-08T01:47:03+5:30
आयुष्यमान भारत योजनेतहत दहा कोटी कुटुंबियांसाठी आरोग्य विमा योजना घोषित केल्यानंतर सरकार आता देशभरातील ११.५ लाख शासकीय आणि अनुदानित शाळांतील जवळपास दहा कोटी मुलांसाठी माध्यान्ह भोजन योजनेची भव्य भेट देणार आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : आयुष्यमान भारत योजनेतहत दहा कोटी कुटुंबियांसाठी आरोग्य विमा योजना घोषित केल्यानंतर सरकार आता देशभरातील ११.५ लाख शासकीय आणि अनुदानित शाळांतील जवळपास दहा कोटी मुलांसाठी माध्यान्ह भोजन योजनेची भव्य भेट देणार आहे. पंतप्रधानांकडून घोषित केल्या जाणाऱ्या या योजनेसाठी सरकारला हजारो कोटींचा अतिरिक्त खर्च येईल.
माधान्य भोजनासाठी (२००६ च्या दराने) सरकार प्राथमिक मुलांसाठी प्रत्येकी ४ ते ६ रुपये देते. वाहतुकीचा खर्चासोबत दरमहा स्वयंपाकी आणि मदतनीसांसाठी एक हजार रुपये दिले जातात. या योजनेच्या निधीत सरकार किमान ३३ टक्के वाढ करण्याची शक्यता आहे, असे समजते.
प्राथमिक शाळेतील माध्यान्ह भोजनाच्या खर्चात प्रत्येकी ४.१३ रुपये ते ६.१८ रुपयांची वाढ होईल. तसेच उच्च प्राथमिक शाळेसाठी या खर्चात प्रत्येकी ५.८८ रुपये ते ८.८८ रुपयांपर्यंत वाढ होईल. माध्यान्ह भोजन योजनेसाठी सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १०,५०० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र २०१४-१५ या वर्षाच्या तुलनेत हा निधी कमी आहे. त्यावेळी १०,५२३ कोटी रुपये देण्यात आले होते.