राज्यात केव्हाही ‘मध्यावधी’ निवडणूक!

By admin | Published: November 19, 2014 09:50 AM2014-11-19T09:50:05+5:302014-11-19T09:50:05+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आज राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक होऊ शकते, असे भाकीत वर्तविल्यामुळे राजकीय पतंगबाजीला पुन्हा ऊत आला.

'Mid-term' elections anytime in the state! | राज्यात केव्हाही ‘मध्यावधी’ निवडणूक!

राज्यात केव्हाही ‘मध्यावधी’ निवडणूक!

Next

शरद पवार यांचे भाकीत : मुख्यमंत्री म्हणतात, सरकारला धोका नाही

यदु जोशी, चोंढी (अलिबाग)
राज्यातील भाजपाला सरकारला ‘स्थैर्य’ लाभावे म्हणून आतून-बाहेरून पाठिंबा देऊ केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आज राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक होऊ शकते, असे भाकीत वर्तविल्यामुळे राजकीय पतंगबाजीला पुन्हा ऊत आला. तर दुसरीकडे, पवार काहीही म्हणोत आमचे सरकार स्थिर आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला!
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची कारणमीमांसा व भविष्यातील वाटचालीचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन दिवसांची
बैठक आजपासून अलिबागजवळील चोंडी येथील एका रिसोर्टवर सुरू आहे. बैठकीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष (पान ५ वर)

सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते असे निवडक २०० जण बैठकीत सहभागी झाले आहेत.
पवार म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारला सरसकट पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेऊ शकत नाही. सरकारने वादग्रस्त विषयांत लक्ष घातले नाही, सामूहिकपणे विकासाचे निर्णय झाले नाहीत तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. सध्याची परिस्थिती दीर्घकालिन स्थिरतेला मदत करणारी दिसत नाही. ती आणखी बिघडली तर निवडणुकीला सामोरे जावे लागेल. राज्य चालविणे अशक्य झाले तर निवडणुकीला सामोरे जावू शकतो का याची चाचपणी करून भाजपाही मध्यावधी निवडणुकीचा विचार करू शकतो.
ही वेळ कधी येईल याची आज खात्री देता येत नाही, त्यामुळे सर्वांनी निवडणुकीसाठी तयार राहावे, असे आवाहनही पवार यांनी केले.
सिंचनाच्या कथित घोटाळ्यांची राज्य सरकारने खुशाल चौकशी करावी, असे आव्हान देऊन पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या मागणीखातर गरजेपेक्षा जास्त सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले हा भ्रष्टाचार नव्हता. आता सामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची वेळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले असूनही कापसात क्विंटलमागे दीड हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, असा आरोपही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)

बहुमताचे प्रमाणपत्र
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिले. त्यांनी विरोधात मतदान केले नाही की बाजूने केले नाही. हे सरकार चालेल तितके चालेल. ते पाच वर्षे टिकविण्याचा मक्ता राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला नाही, असा इशारा देत भाजपाकडे १२२ आमदार होते. शिवसेनेकडे ६३, काँग्रेसकडे ४२ असे दोन्हींमिळून १०५ आमदार होतात. आम्ही तटस्थ होतो. याचा अर्थ भाजपाकडे बहुमत होते, असे प्रमाणपत्र पवार यांनी दिले.

स्थिर सरकार - मुख्यमंत्री
राज्यातील सरकार स्थिर आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील जनतेने खूप अपेक्षेने सरकार निवडून दिले आहे. सरकारने ५ वर्षे काम करावे अशी जनतेची अपेक्षा आहे. विधानसभेतील एकाही पक्षाच्या आमदाराला मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील, असे वाटत नाही. सेनेकरिता चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत. त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.

विरोधकाचीच भूमिका बजावणार
महाराष्ट्रातील मतदारराजाने पवारांना माफ करावे. ते केव्हा काय बोलतात ते त्यांना कळत नाही, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाने हे लक्षात घ्यावे की पवार बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत. आम्ही ठामपणे विरोधकांची भूमिका बजावणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीला काँग्रेस तयार
निवडणुका कधीही झाल्या तरी त्याकरिता काँग्रेस तयार आहे, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रावर भाजपा मध्यावधी निवडणुका लादू शकते. परंतु त्या परिस्थितीला आम्ही घाबरत नाही. उलटपक्षी निर्धाराने निवडणुकीचा सामना करू, असेही ठाकरे म्हणाले.

Web Title: 'Mid-term' elections anytime in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.