‘आयुष्मान भारत’ योजनेत मध्यमवर्गीयांचाही समावेश व्हावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 04:26 AM2020-01-22T04:26:21+5:302020-01-22T04:26:54+5:30
केंद्र सरकारने सुरू केलेली आयुष्मान भारत योजना ही अधिक व्यापक करून त्यामध्ये मध्यमवर्गीयांचा समावेश करावा
केंद्र सरकारने सुरू केलेली आयुष्मान भारत योजना ही अधिक व्यापक करून त्यामध्ये मध्यमवर्गीयांचा समावेश करावा, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र अधिक सक्षम करावीत. वैद्यकीय शिक्षणासाठी अधिक सोयी-सवलती उपलब्ध व्हाव्यात, अशा अपेक्षा आहेत.
सरकारने आरोग्य खात्यासाठीच्या निधीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ग्रामीण भागामध्ये अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकारने देशातील गरिबांसाठी आयुष्मान भारत ही योजना सुरू केली आहे. आता या योजनेची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे केवळ दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी ही योजना न ठेवता, त्यामध्ये मध्यमवर्गीयांचा समावेश करून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत योजनेच्या खर्चाची रक्कमही वाढवून मिळण्याची अपेक्षा आहे.
ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य सेवा ही अतिशय दयनीय आहे. या सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांचा दर्जा सुधारून त्यांना वेलनेस क्लिनिकचे स्वरूप मिळावे, यासाठी सरकारने योजना आखणे हे अतिशय गरजेचे आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे असून, त्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये काही योजना होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे या केंद्रांमध्ये प्रशिक्षित डॉक्टरांची नेमणूक केली जावी, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये चांगली आरोग्य सेवा सहज उपलब्ध होऊ शकेल. आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील अनेक कर्मचारी हे अर्धवेळ असून, त्यांना पुरेसे मानधन दिले जात नाही. या कर्मचाºयांना योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी जास्तीची तरतूद करण्याची गरज आहे. सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला असला तरी, सरकारने आरोग्य क्षेत्रासाठीची तरतूद कमी करू नये, एवढीच अपेक्षा आहे.
- डॉ. श्याम अष्टेकर, नाशिक
(लेखक एसएमबीटी कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.)
वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवावी
वैद्यकीय शिक्षणासाठी सरकारने अधिक सुविधा उपलब्ध करून देतानाच या शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. देशात डॉक्टरांची संख्या कमी असून, त्यांचा तुटवडा कमी व्हावा यासाठी अधिक वैद्यकीय महाविद्यालये निर्माण व्हावीत. त्याचप्रमाणे सध्याच्या महाविद्यालयांची गुणवत्ता वाढावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे. वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य सेवा यांनी हातामध्ये हात घालून काम केल्यास देशाच्या आरोग्याचा प्रश्न बºयाच प्रमाणामध्ये मार्गी लागू शकेल, अशी आशा वाटते.