‘मिग-२९’ विमानांमुळे हवाई दलास नवे बळ; पाच मिनिटांत झेप घेण्याची क्षमता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:10 AM2018-10-08T00:10:52+5:302018-10-08T00:17:24+5:30
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मोलाचे स्थान असलेली ‘मिग-२९’ विमाने अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांनंतर अधिक बलशाली आणि भेदक झाल्याने हवाई दलास नवे बळ मिळाले आहे.
आदमपूर (जालंधर): भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मोलाचे स्थान असलेली ‘मिग-२९’ विमाने अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांनंतर अधिक बलशाली आणि भेदक झाल्याने हवाई दलास नवे बळ मिळाले आहे. खास करून हवाई दलास लढाऊ विमानांचा तुटवडा असताना हे नवे शक्तिस्थान आश्वासक आहे.
आदमपूर हा हवाई दलाचा ‘मिग-२९’ विमानांचा सामरिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेला महत्त्वाचा तळ आहे. सोमवारी साजऱ्या होत असलेल्या हवाईदल दिनानिमित्त या हवाईदल तळावरील फ्लाईट लेफ्टनंट किरण कोहली यांनी ‘मिग-२९’ विमाने आता कशी अधिक सक्षम झाली आहेत, याची माहिती दिली.
हवाई दलाच्या एका स्वाड्रनमध्ये १६ ते १८ लढाऊ विमाने असतात. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी अलीकडेच सांगितले होते की, या सशस्त्र दलास लढाऊ विमानांच्या तुटवड्याची मोठी समस्या भेडसावत आहे. हवाई दलासाठी ४२ स्वाड्रन मंजूर आहेत; पण त्यापैकी फक्त ३१ स्वाड्रन कार्यरत आहेत. पूर्ण ४२ स्वाड्रन असल्या तरी चीन व पाकिस्तान या दोन शेजारी देशांच्या एकत्रित क्षमतेहून त्या खूपच कमी आहेत, असे हवाई दलप्रमुख म्हणाले होते.
या पार्श्वभूमीवर ‘मिग-२९’ विमाने अधिक बलशाली व भेदक होणे आश्वासक आहे. मूळ रशियन बनावटीची ही विमाने आता हवेत उड्डाण करीत असतानाच इंधन भरून घेण्यास, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे वाहून नेऊन त्यांचा विविध दिशांना अचूक मारा करण्यास सक्षम झाली आहेत. भारतीय हवाई दलात ‘मिग-२९’ लढाऊ विमानांच्या एकूण तीन स्वाड्रन असून त्यापैकी दोन आदमपूर तळावर आहेत. पाकिस्तान सीमेपासून सुमारे १०० किमी व चीन सीमेपासून २५० किमी अंतरावर असलेला हा तळ सामरिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी आहे. फ्लाईट लेक्टनंट कोहली म्हणाले की, सुधारित ‘मिग-२९’ विमाने अधिक सफाईदार कसरती करू शकत असल्याने त्यांचा हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर व हवेतून समुद्रातील जहाजांवरही हल्ला करण्यास अधिक प्रभावी उपयोग केला जाऊ शकतो. शिवाय ही विमाने उड्डाण करत असतानाच इंधन भरून घेऊ शकत असल्याने ती अधिक दूरवरचा पल्ला गाठू शकतात.
आणखी एका हवाई दल अधिकाºयाने सांगितले की, ही विमाने सरळ झेप घेऊ शकत असल्याने त्यांना मोठी धावपट्टी लागत नाही. शत्रूच्या विमानाने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्याचे लक्षात येताच ती पाच मिनिटांत उड्डाण करून लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहेत. (वृत्तसंस्था)