Jammu Kashmir Target Killing: 'टार्गेट किलिंग'मुळे काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण, रेल्वे अन् बस स्थानकांवर परराज्यातील मजुरांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:53 PM2021-10-19T18:53:37+5:302021-10-19T18:53:58+5:30
Jammu Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असताना आता परराज्यातील मजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Jammu Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असताना आता परराज्यातील मजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रवासी मजूर आपल्या कुटुंबियांसह काश्मीरमधून बाहेर पडण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करत आहेत. दहशतवाद्यांकडून अल्पसंख्याक आणि परराज्यातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये उदरनिर्वाह करत असलेल्या परराज्यातील मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर प्रवासी मजुरांची घरी परतण्यासाठी लांबच लाब रांग लागलेली पाहायला मिळाली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि उधमपूरमध्ये रेल्वे स्थानकं, बसं स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. कारण या स्थानकांवर प्रवासी संख्या वाढली आहे. सर्वजण आपापल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे व बस स्थानकांवर गर्दी करत आहेत. मंगळवारी जम्मू रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी मजुरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
हिवाळ्याआधीच परतीच्या प्रवासाला निघतात मजूर
उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तराखंडमधून जवळपास ३ ते ४ लाख मजूर दरवर्षी नोकरीच्या शोधात काश्मीरमध्ये येतात. घर उभारणी, वेल्डिंग आणि शेतीच्या कामांसाठी हे मजूर काश्मीरमध्ये येत असतात. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तापमान घसरण्याआधीच हे मजूर आपापल्या राज्यात परत जात असतात. पण गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. परराज्यातील व्यक्तींना दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जात आहे. मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे वेळेआधीच सर्व मजूर आपापल्या राज्यात परतण्यासाठी रेल्वे, बस स्थानकांवर गर्दी करत आहेत.
गेल्या रविवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका घरात घुसून बिहारच्या दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तर याआधी एका बिहारी पाणीपुरीवाल्याचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती. आतापर्यंत ११ नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.