दुष्काळामुळे स्थलांतर वाढले
By admin | Published: April 27, 2016 02:25 AM2016-04-27T02:25:12+5:302016-04-27T02:25:12+5:30
दुष्काळामुळे लोक गावातून शहराकडे पलायन करीत असल्याचे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने कबूल केले आहे.
नवी दिल्ली : दुष्काळामुळे लोक गावातून शहराकडे पलायन करीत असल्याचे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने कबूल केले आहे. परंतु उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने मात्र अशा पलायनाचा इन्कार केला आहे.
मंगळवारी राज्यसभेत पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या २८ जिल्ह्यांमधील २८६६२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. दुष्काळ परिस्थिती हाताळण्यासाठी येथील राज्य सरकारने आॅक्टोबर २०१५ ते जून २०१६ या कालावधीसाठी जलसंकट कृती योजना तयार केली होती. ज्यावर सध्या काम सुरू आहे.
१८ एप्रिलपर्यत राज्यातील ३३५१ गावे आणि ५४०२ वस्त्यांमध्ये ४०१२ टँकर एवढा पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पुढेही गरजेनुसार हा पाणीपुरवठा सुरु राहील. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जलसंकट कृती योजना प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
>मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचे स्पष्टीकरण
यादव यांनी सांगितले की, मध्य प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार बुंदेलखंड क्षेत्रात हातपंपातील रायझर पाईपच्या लांबीत वाढ, सिंगल फेज पॉवर पंप, निष्क्रिय पाईप पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचा विकास, बोअरवेल, नव्या ट्युबवेल आणि टँकरचा वापर करुन पाणीपुरवठा केला जात आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात बुंदेलखंड क्षेत्रासाठी २०० कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे. याअंतर्गत ५० दुष्काळग्रस्त जिल्ह्णांमध्ये ५७८६ नवे हातपंप, ३५२७ रिबोर उभारणी आणि ४४० टँकर खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय १ लाख ६८ हजार ३७३ हातपंपांची दुरुस्ती केली जात आहे.