७४ हजार लोकांचं स्थलांतर, ४४२ गावांमध्ये अलर्ट; गुजरातच्या किनाऱ्यावर आदळणार Cyclone Biporjoy
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 07:23 AM2023-06-15T07:23:12+5:302023-06-15T07:26:51+5:30
बिपरजॉय चक्रीवादळ आज संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचं सांगण्यात आलंय.
बिपरजॉय चक्रीवादळ आज संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचं सांगण्यात आलंय. या अतिशक्तिशाली वादळाचा तडाखा पाहता आज कच्छसह गुजरातच्या संपूर्ण किनारी भागात लॉकडाऊन असेल. गुजरातच्या सर्व किनारपट्टी भागात शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. पोलीस-प्रशासनाच्या परवानगीनंच लोकांना बाहेर पडता येईल.
दरम्यान, गुजरात सरकारनं आतापर्यंत राज्यातील आठ जिल्ह्यांतील ७४,४३५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळाचा फटका बसू शकतो अशा जिल्ह्यांतील गावांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेय. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. समोर आलेल्या नव्या माहितीनुसार बिपरजॉयच्या दिशेत थोडा बदल झाला असून ते कच्छच्या दिशेनं वळलं आहे. अशा परिस्थितीत कच्छला जास्तीत जास्त अलर्टवर ठेवण्यात आलेय.
#WATCH | Gujarat: Mandvi witnesses rough sea conditions and strong winds under the influence of #CycloneBiporjoy
— ANI (@ANI) June 15, 2023
As per IMD's latest update, VSCS (very severe cyclonic storm) Biparjoy to cross Saurashtra & Kutch & adjoining Pakistan coasts b/w Mandvi & Karachi near Jakhau Port… pic.twitter.com/QmebPZCsKQ
दरम्यान, या वादळाच्या पार्श्वभूमीवर एकट्या कच्छमध्ये सुमारे ३४,३०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. यानंतर जामनगरमध्ये १० हजार, मोरबीमध्ये ९,२४३, राजकोटमध्ये ६,०८९, देवभूमी द्वारकामध्ये ५,०३५, जुनागढमध्ये ४,६०४, पोरबंदर जिल्ह्यात ३,४६९, गीर सोमनाथ जिल्ह्यात १,६०५ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार ज्या वेळी हे वादळ गुजरातमध्ये आदळेल तेव्हा १२० ते १३५ किमी वेगानं वारे वाहतील. अशा परिस्थितीत लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एनडीआरएफच्या टीम तैनात
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफने गुजरात आणि महाराष्ट्रात पथके तैनात केली आहेत. गुजरातमध्ये १८ टीम तैनात असतील. याशिवाय दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव इथंही टीम तैनात असतील. गुजरातबद्दल बोलायचं झालं तर गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एनडीआरएफच्या ४ टीम, तीन टीम राजकोट आणि तीन टीम द्वारकामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
याशिवाय जामनगरमध्ये दोन, पोरबंदर, जुनागड, गीर सोमनाथ, मोरबी, वलसाड आणि गांधीनगरमध्ये प्रत्येकी एक टीम तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर येथे एनडीआरएफच्या १४ टीम तैनात करण्यात आल्यात. यापैकी ५ मुंबईत तैनात करण्यात आले आहेत, तर उर्वरित अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहेत.