‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील मगरींचे स्थलांतर; सी-प्लेन सेवेसाठी खटाटोप?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 04:46 AM2019-01-28T04:46:26+5:302019-01-28T06:38:10+5:30
पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण केले पुढे
अहमदाबाद : जगातील सर्वांत उंच म्हणजेच १८२ मीटर उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील दोन तलावांमधील मगरींचे स्थलांतर करण्यात येत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप होत आहे.
वन संरक्षक (वडोदरा वन्यजीव क्षेत्र) आराधना साहू यांनी सांगितले की, आतापर्यंत १२ मगरींचे स्थलांतर करण्यात आले आहे. दोन्ही तलावांत ३०० मगरी असून, ३० पिंजरे लावण्यात आले आहे. नेमक्या किती मगरी पकडून त्यांचे स्थलांतर करायचे आहे, याचा निश्चित आकडा ठरलेला नाही. आतापर्यंत पकडलेल्या मगरी सध्या वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येत असून, काही दिवसांनी त्यांना लवकरच सरदार सरोवातील मुख्य पाणीसाठ्यात सोडण्यात येणार आहे. सी-प्लेन सेवेसाठी हा घाट घातला जात आहे, या आरोपाचे आराधना साहू यांनी खंडन केले. त्या म्हणाल्या की, सर्वच्या सर्व मगरींचे स्थलांतर करण्याची अद्याप कोणतीही योजना नाही. आम्हाला त्याबाबत सूचना नाहीत. आम्ही केवळ पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे.
मंत्र्यांनी केले होते सूतोवाच
अहमदाबादेतील साबरमती रिव्हरफ्रंट येथून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सी-प्लेन सेवा सुरू करण्याचे सूतोवाच नागरी उड्डयनमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे मगरींचे स्थलांतर करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
गुजरातच्या नागरी उड्डयन खात्याचे प्रधान सचिव एस. जे. हैदर यांनी सांगितले की, याबाबत निश्चित काही ठरलेले नाही. परंतु ही सेवा पुतळ्याच्या परिसरातील दोन तलावांमध्ये सुरू होण्याची अधिक शक्यता आहे.