लसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 12:50 AM2021-01-18T00:50:04+5:302021-01-18T06:56:19+5:30
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी ७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात आला होता. यातील एकालाही रिॲक्शन झाली नाही, अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी दिली. येथील कर्मचाऱ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई : देशभरात शनिवारी उत्साहात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर रविवारी राज्यात लस घेतलेल्या काहींना थंडी, ताप व उलट्यांचा त्रास झाला. जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, अकोला, बीड, कराड येथेही काहींना थंडी, ताप आला. या सर्वांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. थंडी, तापाची सौम्य लक्षणे असून कोणालाही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जळगाव, औरंगाबादला कोविशिल्ड लस घेतलेल्या १६ जणांना थंडी, तापाची सौम्य लक्षणे आढळली. चौघांना एक-दोन दिवसांंत रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी ७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात आला होता. यातील एकालाही रिॲक्शन झाली नाही, अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी दिली. येथील कर्मचाऱ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
कऱ्हाड (जि. सातारा) येथे पाच आरोग्य सेवकांना अचानक त्रास जाणवू लागला. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्याने सर्वांना सायंकाळी घरी सोडण्यात आले. बीड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून काहींना ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवत असल्याचे समोर आले. जवळपास १४ जणांना उपचार करून तात्काळ सुटी देण्यात आली. अकोल्यात रविवारी सकाळी लस घेतलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना थंडी, ताप आला. दोघींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रिॲक्शन हे सकारात्मक -
कोणत्याही लसीकरणानंतर रिॲक्शन येत असते. साैम्य स्वरुपात ताप येणे ही एकप्रकारे सकारात्मक रिॲक्शन असते. लसीकरणानंतर शरीरात प्रतिसाद सुरू झाला, हे त्यातून दिसून येते. गंभीर रिॲक्शन ही लसीकरणानंतर अर्ध्या तासातच येत असते.
- डॉ. विजय वाघ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी, औरंगाबाद
देशात ४४७ जणांवर लसीचे दुष्परिणाम -
आतापर्यंत देशभरातून एकूण ४४७ जणांवर लसीचे दुष्परिणम दिसून आल्याची माहिती केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने दिली आहे. यापैकी ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये एक नर्स आजारी पडली. तर, दिल्लीमध्येही एका जणाची प्रकृती बिघडली. केवळ दिल्लीमध्ये ५१ जणांवर परिणाम दिसून आले.