तिरुपतीमधील शिवरायांच्या मूर्ती वादावर अखेर पडदा, नार्वेकरांची यशस्वी मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 14:47 IST2022-08-03T14:46:43+5:302022-08-03T14:47:38+5:30
गेल्या 15 दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती न लावण्या बाबतचे तिरुपती देवस्थानच्या टोलनाक्यावरील व्हिडिओ फिरत असल्याने महाराष्ट्रात सर्वच पक्षांत संतप्त प्रतिक्रिया उमटत होती.

तिरुपतीमधील शिवरायांच्या मूर्ती वादावर अखेर पडदा, नार्वेकरांची यशस्वी मध्यस्थी
मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असलेली असलेली वाहने तिरूपती देवस्थानाच्या टोलनाक्यांवर अडवण्यात येत असल्याचे व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात प्रचंड क्षोभ निर्माण झाला होता. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर हे तिरुपती देवस्थानाच्या बोर्डवर सदस्य असल्याने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते 'धनंजय जुन्नरकर यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना विनंती केली होती. त्याची त्वरीत दखल घेऊन नार्वेकर यांनी सदर समस्या सोडवलेली आहे.
गेल्या 15 दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती न लावण्या बाबतचे तिरुपती देवस्थानच्या टोलनाक्यावरील व्हिडिओ फिरत असल्याने महाराष्ट्रात सर्वच पक्षांत संतप्त प्रतिक्रिया उमटत होती. कोणत्याही देवांच्या, राजकीय मूर्त्या, झेंडे, स्टीकर लावल्यास गाड्या सोडणार नाही, असे व्हिडीओत प्रसिद्ध झाले होते. सदर प्रकरण चिघळल्यास मोठी अशांतता माजू शकते हा गंभीर धोका ओळखून धनंजय जुन्नरकर यांनी मिलींद नार्वेकर यांना समस्या सोडवण्यासाठी विनंती केली होती.
मिलींद नार्वेकर यांच्या मातोश्रीचे नुकतेच निधन झालेले होते आणि त्यांचा दुखवटा देखील संपला नसतानाही त्यांनी तेथील व्यवस्थापकीय प्रमुख धर्मा रेड्डी यांना पत्र लिहीले, व त्यांची भेट घेतली. त्याबद्दल खुलासा करणारा व्हिडिओ देखील प्रसारीत केला. तसेच धर्मा रेड्डी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीदेखील भेट दिली. सदर मुर्ती रेड्डी यांनी आदरपूर्वक स्वीकारली. मूर्ती बाबत कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असल्याने, जुन्नरकर यांनी आता सदर वादावर आता पडदा पडल्याचे लोकमतला सांगितले.