पाकिस्तानकडून एलओसीवर सैन्य, शस्त्रांची जमावजमव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 08:30 AM2019-03-07T08:30:14+5:302019-03-07T08:30:52+5:30
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघ करत आहे.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघ करत आहे. अशातच पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जादाचे लष्कराच्या तुकड्या आणि शस्त्रास्त्रे जमविण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा क्षेत्राशी संबंधीत सुत्रांनी वृत्तसंस्थेला ही माहीती दिली आहे.
पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर 27 फेब्रुवारीला पाकच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसत हल्ल्याचा प्रयत्न केला. याला प्रत्यूत्तर देताना पाकचे एफ-16 आणि भारताचे मिग 21 बायसन ही विमाने पडली. यानंतर पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले असून भारतानेही जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. यामुळे तणावाखाली असलेल्या पाकिस्तानने सैन्याची जमावजमव सुरु केली आहे.
अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानने लष्कराच्या तुकड्या आणि युद्धसामुग्री तैनात केली होती. भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानने तेथील तुकड्या आणि शस्त्रास्त्रे एलओसीवर हलविली आहेत. पाकिस्तानच्या या हालचालींवर भारताने आक्षेप नोंदविला असून एलओसीवरील रहिवाशी भागाला लक्ष्य केल्यास पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्रापासून नौशेरा सेक्टरमध्ये जोरदार गोळाबार केला होता. यावेळी त्यांनी भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. 155 एमएम आर्टिलरी गनमधून गोळाबार केला. यानंतर भारताच्या जवानांनीही त्यांना बोफोर्स तोफांद्वारे तोफगोळे डागून प्रत्त्यूत्तर दिले. यानंतर दोन्ही बाजुच्या लष्काराच्या अधिकाऱ्यांनी हॉटलाईनवर चर्चा केली. यावेळी भारताच्या रहिवाशी भागाला लक्ष्य न करण्याचे बजावण्यात आले आहे.
भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्यांनुसार पाकिस्तानी लष्कराने बुधवारी कृष्णाघाटी आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये सैन्याच्या चौक्या आणि रहिवाशी भागात गोळीबार केला. यावेळी मोर्टारही डागण्यात आले. या गोळीबारात कोणतेही नुकसान झालेले नसले तरीही भारतानेही जोरदार प्रत्यूत्तर दिल्याचे म्हटले आहे.
नौशेरा सेक्टरमध्ये दोन्ही बाजुंकडून गोळीबार तीन तास सुरू राहिला त्यात एक जवान जखमी झाला. कृष्णा घाटीत गोळीबार सकाळी सहा ते रात्री ८.१५ पर्यंत सुरू होता. सुंदरबनी सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता गोळीबार सुरू होऊन बुधवारी पहाटे साडेचारला थांबला.