लष्करी मोहीम सुरूच राहणार, काश्मीरमधील संवादकाच्या नियुक्तीचा परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:38 AM2017-10-26T04:38:11+5:302017-10-26T04:38:26+5:30
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खो-यातील सर्वसंबंधितांशी संवाद साधून तेथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने संवादक म्हणून गुप्तचर विभागाचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खो-यातील सर्वसंबंधितांशी संवाद साधून तेथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने संवादक म्हणून गुप्तचर विभागाचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली असली तरी काश्मीर खो-यातील लष्करी मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार मजबूत स्थितीत आहे. सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थितीत व्यापक सुधारणा झाली आहे, असे भारतीय लष्कर प्रमुख जन. बिपीन रावत यांनी स्पष्ट केले.
‘फिक्की’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संवादकाच्या नियुक्तीमुळे भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीरमधील मोहिमेवर काही परिणाम होईल का? असे विचारले असताना जन. रावत म्हणाले की, यावर म्हणजे एका शब्दात ‘नाही’ असे उत्तर आहे. नाही असे काहीच होणार नाही. तुम्हाला जे वाटते ते चुकीचे आहे. सरकारचे धोरण फलदायी ठरत आहे. मागील काही महिन्यांत सीमापार घुसखोरीत कमालीची घट झाली आहे. एकूणच राज्यातील स्थिती सुधारली आहे, असेही जन. रावत यांनी यावेळी सांगितले.