लष्करी उपकरणे, सुटे भाग भारतात विकसित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:51 AM2017-07-24T00:51:48+5:302017-07-24T00:51:48+5:30
रणगाडे आणि लष्करीप्रणालीसाठी महत्त्वपूर्ण उपकरणे आणि सुट्या भागांचे उत्पादन भारतातच करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रणगाडे आणि लष्करीप्रणालीसाठी महत्त्वपूर्ण उपकरणे आणि सुट्या भागांचे उत्पादन भारतातच करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे. ही उपकरणे आणि सुटे भाग आयात करण्यात येत असल्याने युद्धाच्या तयारीत कमालीची दिरंगाई होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशभरातील ४१ आयुध निर्माण कारखान्यांची संघटना असलेल्या मंडळाने सुटे भाग आणि अन्य उपकरणांची आयात ६० टक्क्यांवरून येत्या तीन वर्षांत ३० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीमावर्ती चौक्यांवर तोफखाना आणि अन्य महत्त्वपूर्ण सैन्य सामग्रीचा पुरवठा करण्याची व्यवस्था पाहणाऱ्या आयुध महासंचालकांनी रणगाडे आणि अन्य आयुधप्रणालींचे सुटे भाग भारतातच विकसित करण्यासाठी धोरण ठरविण्यासाठी भारतातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
आयुध निर्माण कारखान्यांचे मंडळ आणि आयुध महासंचालनालय दरवर्षी १० हजार कोटी रुपये किमतीचे सुटे भाग खरेदी करते. सैन्य दलांची अशी तक्रार आहे की, रशियाकडून महत्त्वपूर्ण सुटे भाग आणि उपकरणांच्या पुरवठ्यात खूप उशीर होतो. त्यामुळे या उपकरणांच्या देखभालीवर परिणाम होतो. भारताला लष्करी उपकरणांचा पुरवठा
करणारा रशिया हा सर्वात मोठा देश आहे.
१३ लाखांची फौज असलेल्या भारतीय लष्कराच्या मोहिमेच्या तयारीतील उणिवांवर विचार करूनच सरकारने सुटे भाग भारतातच विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून युद्धाची तयारी अधिक चोख करता येईल. चीनकडून मिळणाऱ्या युद्धाच्या धमक्या व पाकसोबतच्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने आता युद्धाच्या तयारीसाठी आयातीवर विसंबवून न राहण्याचे ठरविले आहे.
भारत रशियाकडून घेणार नवे मिग-३५ ?
भारताला रशिया नवे जेट मिग-३५ हे लढावू विमान विकण्याक उत्सूक आहे. भारताने हे विमान विकत घेण्याची इच्छा प्रकट केली असून त्याच्या गरजा काय आहेत हे समजून घेतले जात आहे, असे मिग कार्पोरेशनचने महासंचालक इल्या तारासेन्को यांनी सांगितले.
मिग-३५ हे लढावू विमान लॉकहीड मार्टिनच्या पाचव्या पिढीतील एफ-३५ या लढावू विमानापेक्षा निश्चितपणे उत्तम आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेच्या जेट विमानांना हवेतील लढाईत मिग-३५ हरवेल, असा दावाही तारासेन्को यांनी केला.
मॅक्स २०१७ या हवाई कार्यक्रमानिमित्त येथे वार्ताहरांशी बोलताना तारासेन्को म्हणाले की, ‘‘गेल्या जानेवारी महिन्यात मिग-३५ सादर केल्यानंतर मिग कार्पोरेशननेमिग-३५ भारतात आणि जगाच्या इतर भागांत सादर करायला सक्रिय सुरवात केली.
भारताला या विमानाचा पुरवठा करण्याचा आमचा विचार आहे आणि आम्ही भारताच्या हवाई दलाशी त्याच्या निविदा मिळवण्यासाठी सक्रिय आहोत, असे ते म्हणाले. मिग-३५ हे रशियाचे खूपच विकसित (फोर प्लस प्लस जनरेशन) बहुउद्देशीय लढावू विमान आहे.