दूध आणखी महागणार, लवकरच 'एवढ्या' रुपयांची होणार वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 01:47 PM2019-03-28T13:47:48+5:302019-03-28T13:57:56+5:30
आपला महिन्याचा बजेट लवकरच कोलमडण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीः आपला महिन्याचा बजेट लवकरच कोलमडण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा दुधाची दरवाढ होणार असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. CRISILच्या रिपोर्टनुसार, स्किम्ड मिल्कच्या उत्पादनात आलेली घट आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मागणीमुळे दुधाचे दर पुन्हा एकदा भडकणार आहेत. दुधाचे हे वाढणारे दर येत्या तिमाहीमध्ये लागू होण्याची शक्यता आहे.
दुधाचे दर वाढल्यानंतर इतर डेअर उत्पादनं जसे की, लोणी, तूप, दही आणि फ्लेवर्ड मिल्क महागणार आहेत. परंतु अमूल आणि मदर डेअरीनं अद्यापही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दूध, आइसक्रीम यांसारख्या इतर दुधाच्या उत्पादनांची किंमत वाढणार असून, उत्पादनांच्या कमतरतेमुळे दुधाच्या दरात 1 ते 2 रुपयांची प्रतिलिटर वाढ होण्याची प्रस्तावित आहे. तसेच 2019-20मध्ये दुधाचे उत्पादन 3 ते 4 टक्क्यांनी घटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दुधाचा तुटवडा हा 6 ते 7 टक्क्यांनी वाढणार असून, त्यामुळेच दुधाची कमतरता जाणवणार आहे. 2017मध्येही दुधाच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ झाली होती. जगभरात स्किम्ड मिल्कचा दर 20 टक्क्यांनी वाढला आहे. मार्च 2018च्या शेवटी स्किम्ड मिल्कचा 3 लाख टन साठा होता. परंतु हा साठा आता 25 टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मलाई येत नसलेल्या दुधाला स्किम्ड मिल्क म्हटलं जातं. तर गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारनं अतिरिक्त दूध उत्पादनामुळे पडलेले दर, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर दूध अनुदान योजनेस तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, अनुदानाची रक्कम प्रतिलिटर पाच रूपयांवरून तीन रुपये करण्यात आली आहे.