१ मार्चपासून १०० रुपये लिटर दराने दूधविक्री; शेतकऱ्यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:42 AM2021-02-26T00:42:09+5:302021-02-26T06:55:15+5:30
पेट्रोल घेऊ शकता तर मग दूध का नाही ?
विकास झाडे
नवी दिल्ली : पेट्रोलने शंभरी पार केली तरी या देशातील नागरिक शांत आहेत. डिझेलचे भाव वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक केली तर मग आता आम्ही येत्या १ मार्चपासून ५० रुपये लिटरचे दूध १०० रुपयांनी विकू, असा सज्जड इशारा संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला दिला आहे.
दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन तीन महिन्यांचे झाले. सरकारने प्रत्येकवेळी शेतकऱ्यांची अडवणूक केली आहे. डिझेलचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात ट्रॅक्टर चालविणे अवघड होऊन बसले. १०० रुपयांवर पेट्रोलचचे भाव गेले तरी १३५ कोटी जनता ढीम्मपणे पाहत बसली आहे.
जर नागरिकांना १०० रुपये पेट्रोलचे ओझे होत नाही तर मग याच दराने आम्ही १ मार्चपासून दूध विकणार आहोत, असा संकल्प संयुक्त किसान मोर्चाने केल्याची माहिती सिंघू सीमेवर आंदोलन करीत असलेले भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) जिल्हा प्रमुख मलकीत सिंह यांनी दिली. केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी दुधाचे भाव दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक राज्यात मोठी रॅली
शेतकरी कायद्याच्या विरोधात देशातील प्रत्येक राज्यात एक भव्य रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. यात आंदोलनातील प्रमुख शेतकरी नेते मार्गदर्शनासाठी जाणार आहेत. उद्या २६ फेब्रुवारी रोजी आंदोलनाला तीन महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने युवा किसान दिवस साजरा केला जाणार आहे. उद्या सर्वच सीमांवर आंदोलनाची धुरा तरुण शेतकऱ्यांच्या खांद्यावर दिली जाणार आहे. गुरु रविदास जयंती आणि चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सीमांवर मजूर-किसान एकता दिवस साजरा केला जाणार आहे.