Milkha Singh: स्वप्नं पेरणारे, ती साकारण्याची प्रेरणा देणारे ‘महानायक’ गेले; सारा देश हळहळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 07:13 AM2021-06-20T07:13:32+5:302021-06-20T07:13:48+5:30
महान धावपटू मिल्खासिंग यांना अखेरचा निरोप; राष्ट्रपती,पंतप्रधानांसह बॉलिवूडने वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली: ‘मिल्खाजी, तुम्ही या जगात नाहीत हे स्वीकारायला अद्यापही मन तयार नाही. कदाचित तुमच्याकडून शिकलेली जिद्द न सोडण्याची शिकवण म्हणता येईल. कधीही हार न मानण्याची बाजू म्हणता येईल. सत्य हे आहे की तुम्ही आमच्यात कायम जिवंत रहाल. तुम्ही खूप प्रेमळ, मोठ्या मनाचे आणि दयाळू व्यक्ती होता.
तुम्ही तुमच्या कल्पना, स्वप्न पेरले. ते साकारण्यासाठी कठोर मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर आकाशाला स्पर्श करणेही शक्य असल्याचे दाखवून दिले.’ अनेकांच्या आयुष्यावर तुमचा प्रभाव आहे. जे तुम्हाला एक पिता आणि मित्र म्हणून ओळखतात त्या सर्वांसाठी तुमचा सहवास म्हणजे खरे तर आशीर्वाद आहे. ज्यांना तुमचा सहवास लाभला नाही त्यांना तुमची कहाणी कायम प्रेरणा देत राहील...’
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर यांनी भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना फारच बोलक्या आहेत. त्यांच्या जाण्याने सारा देश हळहळला. राष्ट्रपती, पंतप्रधान, राजकीय नेते, खेळाडू, बॉलिवूड ते सामान्य नागरिकांनी ‘खेळाच्या या महानायकाला’ साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला..., श्रद्धांजली वाहिली. मिल्खा आपल्यात नसले तरी प्रेरणेच्या रूपात कायम हृदयात असतील, अशी शोकाकूल भावना व्यक्त केली.
बॉलिवूडही हळहळले!
महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण, अनिल कपूर, सन्नी देओल, अभिनेते आणि मिल्खासिंग यांची भूमिका साकारणारे फरहान अख्तर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली अर्पण केली. दाक्षिणात्य सुपरस्टार मोहन लाल, अभिनेत्री प्रियंका चोप्रा, तापसी पन्नू यांनीही संवेदना व्यक्त केल्या. सोनू सूदने लिहिले, ‘मिल्खासिंग यांचा संघर्ष कोट्यवधी लोकांना प्रेरणास्पद ठरेल.’ ‘देश महान खेळाडू आणि महान आत्म्यास मुकल्याची भावना अमिताभ यांनी व्यक्त केली.