'मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर, देशाच्या महान खेळाडूबद्दल अफवा नको'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 07:17 PM2021-06-05T19:17:40+5:302021-06-05T19:19:30+5:30
कोरोनावर मात केल्यानंतर मिल्खा सिंग हे ऑक्सिजन सपोर्टवर होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
नवी दिल्ली - भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोना व्हायरसवर मात केली आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलं होतं. मात्र, गुरुवारी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी दिली. तसेच, देशाच्या महान खेळाडूबद्दल अफवा पसरवू नका, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
कोरोनावर मात केल्यानंतर मिल्खा सिंग हे ऑक्सिजन सपोर्टवर होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी अचानक पुन्हा मिल्खा सिंग यांची तब्येत बिघडली. गुरूवारी दुपारी ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी झाल्यानं त्यांना चंडिगढ येथील पीजीआयच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.
Please don't run false news and create rumors about the legendary athlete and pride of India Milkha Singh Ji. He is stable and let's pray for his fast recovery🙏
— Kiren Rijiju (@KirenRijiju) June 5, 2021
सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबद्दल उलट-सुलट चर्चा आणि पोस्ट येऊ लागल्या. त्यामुळे, देशाच्या क्रीडामंत्र्यांनीच ट्विट करुन मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्याबद्दल अफवा पसरवू नका. देशाच्या महान खेळाडूला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा, असे ट्विट रिजिजू यांनी केलंय.
कोरोनाची लागण झाली होती
गेल्या आठवड्यात सोमवारी मिल्खा सिंग यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बुधवारी त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाल्याचे समोर आले आणि त्यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मिल्खा सिंग यांचा मुलगा व गोल्फपटू जीव शनिवारी दुबईहून चंडिगढ येथे दाखल झाला. त्यांची मुलगी मोना मिल्खा सिंग या अमेरिकेत डॉक्टर आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्याही भारतात दाखल झाल्या आहेत.