भाजपाने अयोध्येतील पराभवाचा वचपा काढला, मिल्कीपूरमध्ये दणदणीत विजय मिळवला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:03 IST2025-02-08T17:02:51+5:302025-02-08T17:03:25+5:30

Milkipur By Election Result 2025: अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपाने गतवर्षी लोकसभा निवडणुकीत अयोध्येमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

Milkipur By Election Result 2025: BJP's resounding victory in Milkipur, after defeat in Ayodhya | भाजपाने अयोध्येतील पराभवाचा वचपा काढला, मिल्कीपूरमध्ये दणदणीत विजय मिळवला 

भाजपाने अयोध्येतील पराभवाचा वचपा काढला, मिल्कीपूरमध्ये दणदणीत विजय मिळवला 

अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपाने गतवर्षी लोकसभा निवडणुकीत अयोध्येमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. येथे भाजपाचे चंद्रभानू पासवान आणि समाजवादी पक्षाचे अजित प्रसाद यांच्यात झालेल्या लढतीत चंद्रभानू पासवान यांनी अजित प्रसाद यांचा तब्बल ६१ हजार ७१० मतांनी दारुण पराभव केला.

मिल्कीपूरमधील आमदार अवधेश प्रसाद हे लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाने चंद्रभानू पासवान यांना रिंगणात उतरवले होते. तर चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाने संतोष कुमार यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच भाजपाचे उमेदवार चंद्रभानू पासवान यांचा दबदबा दिसून येत होता. काही अपवाद वगळता ३१ फेऱ्यांपर्यंत चाललेल्या मतमोजणीत प्रत्येक फेरीमध्ये चंद्रभानू पासवान यांनी आघाडी घेतली.

शेवटी ३१ व्या फेरीअखेर भाजपाच्या चंद्रभानू पासवान यांना १ लाख ४६ हजार ३९७ मतं मिळाली. तर समाजवादी पक्षाच्या अजित प्रसाद यांना ८४ हजार ६८७ मतं मिळाली. अशा प्रकारे  चंद्रभानू पासवान यांनी अजित प्रसाद यांचा तब्बल ६१ हजार ७१० मतांनी पराभव केला. येथे चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाकडून लढणारे संतोष कुमार यांना केवळ ५ हजार ४४९ मतं मिळाली.

गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची जबर पिछेहाट झाली होती. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला सपा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यातच अयोध्येतही भाजपाचा उमेदवार पराभूत झाल्याने भाजपावर आणखीनच नामुष्की ओढवली होती. अयोध्येचा ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश होतो, तिथून समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद हे विजयी झाले होते. त्यामुळे धक्का बसलेल्या भाजपासाठी अयोध्येजवळील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनलेली होती. या लढतीत विजय मिळवत भाजपाने आपली प्रतिष्ठा आणि वर्चस्व कायम राखलं आहे. 

Web Title: Milkipur By Election Result 2025: BJP's resounding victory in Milkipur, after defeat in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.