केरळात लाखो बेघर, घरे, शेती उद्ध्वस्त; ११ जिल्ह्यांत आणखी अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:19 AM2018-08-19T02:19:41+5:302018-08-19T02:20:01+5:30
लोकांमध्ये कमालीची घबराट; देवभूमी पूर्वपदावर येण्यास लागणार अनेक वर्षे लागणार
तिरूअनंतरपूरम : केरळमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी व त्यामुळे आलेले पूर यांत लाखो लोक बेघर झाले आहेत. पावसामुळे सर्व धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात येत असून, त्यामुळे रस्ते, घरे, दुकाने सारेच पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा तडाखा व जोरदार वारे यांमुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. कच्च्याच नव्हे, तर पक्क्या घरांचेही प्रचंड नुकसान झाले असून, अशी एक लाखांहून अधिक घरे राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. आताची स्थिती पाहता, राज्य पूर्वपदावर येण्यास अनेक वर्षे लागणार आहेत.
भातशेतीबरोबरच कॉफी व केळीच्या बागा नष्ट झाल्या आहेत. केळीचे खांब उलथून पडल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. शेतांतील पाणी ओसरण्यास बराच काळ लागणार आहे. त्यातच आणखी दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये दोन हजार शिबिरे सुरू असून, त्यात ३ लाखांहून अधिक लोक राहत आहेत. आपणास पुन्हा घरी कधी जाता येईल, हे त्यांना कळेनासे झाले आहे. खालसा एड या आंतरराष्ट्रीय शीख संस्थेने केरळमध्ये अनेक ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. संस्थेचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात शिबिरांच्या ठिकाणी तसेच अन्यत्रही चपात्या, भात, भाजी तयार करून वाटत आहेत. दुबईतही संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारतर्फे मदतीसाठी संस्था स्थापन केली आहे. मदतीसाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन अरब अमिरातीचे पंतप्रधान मोहम्मद बिन रशिद अल मक्तुम यांनी केले आहे. अरब राष्ट्रांत नोकरीसाठी गेलेल्या केरळी लोकांची संख्या काही लाखांमध्ये असल्याने तेथील सरकारने हे पाऊल उचलले आहे.
बचावकार्यात अडचणी
पाणी ओसरले नसल्याने आणि पाऊ स सुरूच असल्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच आहे. लष्करातर्फे तात्पुरते पूल उभारण्याचे काम सुरू आहे, तर तेथील रस्त्यांची लगेच डागडुजी करण्याचे आणि नंतर ते पूर्ववत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.
केरळचा सार्वजनिक बांधकाम विभागही रस्तेदुरुस्तीच्या कामाला लागला असून, रस्त्यांवर पडलेली झाडे तेथून हटवणे हेही मोठे काम होऊ न बसले आहे.
घरदार, शेती सारेच नष्ट झाल्याने अनेक जण मानसिकरित्या पुरते खचले आहेत, तर काहींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे वा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात जखमींबरोबरच मानसिक आजारांनी ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठी असून, त्यात केवळ वृद्धच नव्हे, तर तरुण व लहान मुलेही आहेत. शाळा, महाविद्यालये कित्येक दिवसांपासून बंद आहेत. रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.
पावसाच्या सततच्या तडाख्यांमुळे सुमारे १0 हजार किलोमीटरचे रस्ते एक तर वाहून गेले आहेत, खचले आहेत वा त्यावर इतके खड्डे पडले आहेत की त्यावरून वाहने चालविणे आणि चालणेही धोक्याचे झाले आहे. बºयाच पुलांची अवस्थाही वाईट असून, काही पूल धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. ते ओसरल्यानंतर पुलांवर कचºयाचे ढिग दिसू लागले असून, ते हटविण्याचे काम सुरू आहे.
अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांना अंधारात राहावे लागत आहे, मोबाइल चार्ज करता येत नसल्याने इतरांशी संपर्क तुटला आहे. पिण्याचे पाणीही दुषित झाले असून, पुण्यासह अनेक राज्यांतून तिथे रेल्वेने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अन्नधान्य पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, तर अन्नधान्य तसेच आर्थिक मदत पाठविण्यासाठी ती गोळा करण्याचे काम बºयाच संस्थांनी सुरू केले आहे.