नोटाबंदीमुळे लक्षावधी रोजगार नष्ट

By admin | Published: February 10, 2017 01:18 AM2017-02-10T01:18:21+5:302017-02-10T01:18:21+5:30

यंदाच्या अर्थसंकल्पाने सर्वांनाच निराशेच्या गर्तेत लोटले आहे. अर्थव्यवस्थेत ना दूरगामी बदल घडवण्याची क्षमता अर्थसंकल्पात आहे

Millions of jobs destroyed due to non-combatance | नोटाबंदीमुळे लक्षावधी रोजगार नष्ट

नोटाबंदीमुळे लक्षावधी रोजगार नष्ट

Next

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
यंदाच्या अर्थसंकल्पाने सर्वांनाच निराशेच्या गर्तेत लोटले आहे. अर्थव्यवस्थेत ना दूरगामी बदल घडवण्याची क्षमता अर्थसंकल्पात आहे ना गरीबांविषयी साहानुभूती. नोटाबंदीचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या मुळावरच उठला आहे. हा २0१६ वर्षातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी राज्यसभेत केले.
अर्थसंकल्पावर ते बोलत असताना सभागृह एकाग्र चित्ताने भाषण ऐकत होते. नोटाबंदी, बेरोजगारी, उध्वस्त होत असलेले छोटे व्यापार, उद्योग, शेती व्यवसायाची दैना, कॅशलेस व्यवहारांबाबत चाललेला आग्रह, अशा अनेक मुद्द्यांच्या, तर्कशुद्ध पद्धतीने चिंध्या करीत बजेटमधील बहुतांश दावे त्यांनी खोडून काढले.
चिदंबरम म्हणाले, काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा व दहशतवादी कृ त्यांना मिळणारा निधी खणून काढण्यासाठी हा निर्णय घेतला, असे सरकारने सांगितले. पण यापैकी एकही उद्देश साध्य झाला नाही. साऱ्या जुन्या नोटा बँकेत जमा झाल्या. केवळ भूतान, नेपाळ, बांगला देश व प्रवासी भारतीयांकडे असलेल्या नोटा जमा होऊ शकल्या नाहीत, याचे कारण सरकारने त्यांचा विश्वासघात केला आहे. नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत.
नॅशनल सँपल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार १५ कोटी लोक शेती, बांधकाम इत्यादी क्षेत्रांत रोजंदारीवरील मजूर आहेत. २५.५ कोटी लोक हातगाडीवर भाजीपाल्यासह विविध वस्तू विकणारे,प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, सुतार, चर्मकार, लोहार, अशा स्वयंरोजगाराच्या कमाईतून उपजिविका भागवतात. नोटाबंदीने या ४0 कोटी लोकांचे दैनंदिन जगणेच उध्वस्त केले. कदाचित कालांतराने हे लोक सरकारला क्षमा करतील. मात्र हा विदारक अनुभव ते जन्मभर विसरणार नाहीत.
यूपीए सरकारने दरवर्षी पिकांचा हमीभाव वाढवला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात किमान हमीभावाचा उल्लेखच नाही. त्याऐवजी पीक विमा योजनेचे कौतुक चालवले आहे. नैसर्गिक कारणाने पिकाचे नुकसान झाले तरच शेतकऱ्याला हा विमा मिळणार आहे. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नाही.
दरवर्षी २ कोटी नोकऱ्या व रोजगार पुरवण्याचे वचन देणाऱ्या केंद्र सरकारमुळे प्रत्यक्षात ३ वर्षांत १५ लाख तरुणांनाच नोकऱ्या मिळाल्या, असे सांगून चिदम्बरम म्हणाले की, अमेरिका व युरोप खंडातल्या प्रगत देशांनी अनुक्रमे डॉलर्स आणि युरो या चलनी नोटांचे प्रमाण गेल्या काही वर्र्षात दुपटीने वाढवले आहे. रोज अनेक वस्तू व सेवांची खरेदी लोक करतात, की ज्याविषयी त्यांना खाजगीपण हवे असते. हे सारे व्यवहार कॅशलेस झाले तर त्यातील गोपनीयताच नष्ट होईल. वैयक्तिक जीवनाच्या अधिकारावर अतिक्रमण करणाऱ्या प्रयोगाचा आग्रह कशासाठी?

मोदींनी काल माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविषयी जे उद्गार काढले ते पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला न शोभणारे आहेत, असे नमूद करीत ते म्हणाले की मोदींच्या भाषणात व्यत्यय आणून ते आम्ही हाणून पाडू शकलो असतो.

मात्र पंतप्रधानपद फार
मोठे आहे, पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, वाजपेयी,
चंद्रशेखर यांच्यासारख्या महान व्यक्तींनी हे पद भूषवले आहे.

या पदाचा अपमान करता कामा नये, याचे पूर्ण भान ठेवून निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सभात्याग केला. भविष्यात अशा चुका पंतप्रधान सुधारतील अशी आशा आहे.

Web Title: Millions of jobs destroyed due to non-combatance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.