मोजक्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे माफ; श्रीमंत मित्रांसाठी ५जीचा महाघोटाळा, AAP चा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 06:12 AM2024-04-25T06:12:04+5:302024-04-25T06:12:42+5:30
‘पहिले या, पहिले मिळवा’ तत्त्वाचा पुरस्कार करीत देशाच्या पंधरा लाख कोटींवर घातलेला हा दरोडा सर्वांत मोठा घोटाळा सिद्ध होईल, असा दावा त्यांनी केला.
नवी दिल्ली : आपल्या श्रीमंत मित्रांना मदत करण्यासाठी संसदेत विधेयक पारित करून फाइव्ह-जी स्पेक्ट्रमचा महाघोटाळा करण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असल्याचा आरोप आज आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी केला.
‘पहिले या, पहिले मिळवा’ तत्त्वाचा पुरस्कार करीत देशाच्या पंधरा लाख कोटींवर घातलेला हा दरोडा सर्वांत मोठा घोटाळा सिद्ध होईल, असा दावा त्यांनी केला. देशाच्या संपत्तीवर सरकारच्या मित्रांचा अधिकार आहे का, असा सवाल करीत सरकार देशासाठी नव्हेतर, त्यांच्या मित्रांसाठी सर्व काही करण्यास तयार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने यापूर्वीच काही मोजक्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे माफ केली. त्यांच्या राजवटीत बेइमान आणि चोर लोकांना पक्षात सामील करून त्यांना क्लीन चिट दिली जात आहे. देशापुढे सरकारच्या चेहऱ्याचा बुरखा फाटला आहे, अशी टीका त्यांनी केली.
त्यांना कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे वागणूक मिळतेय
तिहार तुरुंगाचे प्रशासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कुख्यात गुन्हेगार आणि अतिरेक्यांपेक्षाही वाईट वागणूक देत आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पीएमओ आणि उपराज्यपालांचे कार्यालय नजर ठेवून त्यांचे मनोधैर्य खचविण्याचे काम करीत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार आपने केला. दरम्यान, आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांची भेट घेतली.
डॉक्टरही उतरले रस्त्यावर
तुरुंगात केजरीवाल यांना चुकीची वागणूक देण्याच्या विरोधात आयटीओ चौकात आंदोलन करणाऱ्या तीन आप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आप आमदार कुलदीप कुमार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
आंदोलकांमध्ये काही डॉक्टर होते, त्यांनी त्यांचे पांढरे कोट घातले होते. हातात फलक घेतलेल्या आंदोलकांनी केजरीवाल यांना इन्सुलीन देण्याची मागणी केली. ते दीनदयाल उपाध्याय मार्गाकडे येत असताना पोलिसांनी त्यांना अडवले.
सिसोदियांना दिलासा नाही, तुरुंगातच राहणार
मद्य धोरण प्रकरणातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत आज ७ मेपर्यंत वाढ करण्यात आली.