गोडसेबद्दल तुमचं मत काय?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल
By जयदीप दाभोळकर | Published: January 2, 2021 10:47 AM2021-01-02T10:47:15+5:302021-01-02T10:52:53+5:30
मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर ओवेसींनी साधला निशाणा
"माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. मी माझा धर्म समजूनच एक चांगला देशभक्त बनेन आणि लोकांनाही असेच करायला सांगेन. एवढंच नाही, तर स्वराज्य समजून घ्यायचे असेल, तर स्वधर्माला समजून घ्यावे लागेल असं महात्मा गांधी म्हणाले होते," असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांनी केलं होतं. ते 'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज' नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या वक्तव्यावरून एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यावरून एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. तसंच गोडसेबाबत तुमचं मत काय आहे? असा सवालही केला आहे.
"गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? याचं उत्तर मोहन भागवत देतील का? नेल्ली येथे झालेल्या हत्याकांडाबाबत, तसंच १९८४ मधील शीख विरोध आणि २०२० मधील घटनेबद्दल काय विचार आहेत?," असे सवाल ओवेसी यांनी मोहन भागवत यांना केले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारले.
Will Bhagwat answer: What about Gandhi's killer Godse? What about the men responsible for Nellie massacre, anti-1984 anti-Sikh & 2002 Gujarat pogroms?
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) January 1, 2021
It's rational to assume that most INDIANS are patriots regardless of their faith. It's only in RSS's ignorant ideology....[1/2] https://t.co/fZv3GpmlIg
"धर्म कोणताही असला तरी बहुतांश भारतीय देशभक्त आहेत हे मानणं तर्कसंगत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतच एका धर्माच्या लोकांना आपोआप देशभक्तीचं प्रमाणपत्र दिलं जातं. तर इतरांचं जीवन आपण या ठिकाणी अस्तित्वात आहोत हे सिद्ध करण्यात आणि आपण भारतीय आहोत हे सांगण्यातच निघून जातं," असंही ओवेसी म्हणाले.
....that adherents of one religion are automatically issued patriotism certificates while others have to spend their lives proving that even they have the right to exist here & call themselves Indians [2/2]
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) January 1, 2021
काय म्हणाले होते भागवत ?
"पूजा पद्धती, कर्मकांड कुठलेही असोत, मात्र, सर्वांनी एकत्रितपणे रहायला हवं. फरक म्हणजे फाटाफूट नव्हे (difference doesn't mean separatism). जोवर मनात ही भीती असेल, की तुमच्या असल्याने माझ्या अस्तित्वाला धोका आहे आणि आपल्याला माझ्या असल्याने आपल्या अस्तित्वाचा धोका वाटेल, तोवर सौदे तर होऊ शकतात, पण आत्मीयता निर्माण होऊ शकत नाही," असं भागवत म्हणाले होते.
"वेगळे असल्याचा अर्थ असा नाही, की आपण एका समाजाचे अथवा एक धरतीचे पुत्र बनून राहू शकत नाही. एवढेच नाही, तर पुस्तकाचे नाव आणि माझ्या हस्ते त्याचे प्रकाशन, याचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो, की हा गांधीजींना आपल्या सोयीनुसार परिभाषित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महापुरुषांना कुणीही आपल्या सोयीनुसार परिभाषित करू शकत नाही. हे पुस्तक व्यापक संशोधनावर आधारलेले आहे आणि ज्यांचे मत यापेक्षा वेगळे असेल, तेदेखील संशोधन करून लिहू शकतात," असंही भागवत म्हणाले होते.