बिहार निवडणुकीत एमआयएमची उडी
By Admin | Published: September 13, 2015 02:09 AM2015-09-13T02:09:06+5:302015-09-13T02:09:06+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराची महाआघाडी आणि भाजपाप्रणीत रालोआत जोरदार मुकाबला सुरू असतानाच आता खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या आॅल
हैदराबाद : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराची महाआघाडी आणि भाजपाप्रणीत रालोआत जोरदार मुकाबला सुरू असतानाच आता खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या आॅल इंडिया-मजलीस- ए-इत्तेहदुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) सुद्धा या रणसंग्रामात उडी घेतली आहे. परंतु पक्ष नेमक्या किती जागांवर उमेदवार उभे करणार याचा खुलासा मात्र केला नाही. सीमांचलमध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा ओवेसी यांनी शनिवारी केली. सीमांचलमध्ये विधानसभेच्या एकूण २३ जागा आहेत. इतर पक्षांसोबत निवडणूकपूर्व समझोत्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ओवेसी यांनी नकारात्मक उत्तर दिले. एमआयएमच्या या निर्णयाने काँग्रेस, नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीस निवडणुकीत मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एमआयएममुळे मुस्लीम मतांची विभागणी आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाल्यास भारतीय जनता पार्टीला याचा लाभ होऊ शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. एमआयएमने पक्षाच्या बिहार शाखेच्या अध्यक्षपदी अख्तर इमाम यांची नियुक्ती केली आहे. (वृत्तसंस्था) बिहारमध्ये एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के मुस्लीम आहेत. सीमांचलच्या किशनगंजसारख्या मतदारसंघांमध्ये ७० टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. काही मतदारसंघांमध्ये ती २५ ते ४० टक्के एवढी आहे. त्यामुळे सीमांचलमधील २३ जागांवर तिरंगी लढतीची शक्यता आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने अरारिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार हे जिल्हे येतात. एमआयएममुळे मतांची विभागणी होईल हा आरोप निराधार आहे. मुळात तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे.- असदुद्दिन ओवेसी, एमआयएमचे नेते