बिहारमधल्या निवडणुकीत MIM ची उडी, ३७ जागा लढवणार
By Admin | Published: September 12, 2015 12:50 PM2015-09-12T12:50:20+5:302015-09-12T13:21:28+5:30
बिहारमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये MIM सीमांचलमधल्या जागा लढवणार असल्याची घोषणा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
>
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १२ - बिहारमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सीमांचलमधल्या जागा लढवणार असल्याची घोषणा MIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. सीमांचलमध्ये विधानसभेच्या २३ जागा आहेत. सीमांचलसह एकूण ३७ जागांवर MIM आपले उमेदवार उभे करणार आहे. मुस्लीम व दलितांचं वर्चस्व असल्याने या जागांवर प्रचंड मतांनी आमचे उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा ओवेसी यांनी व्यक्त केली आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीचा मुकाबला करण्याच्या ईर्ष्येने एकत्र आलेल्या काँग्रेस, नितिशकुमार व लालूप्रसाद यादव यांच्या आघाडीसाठी हा मोठा झटका ठरण्याची शक्यता आहे. मुस्लीमांच्या मतांची विभागणी झाली आणि MIM मुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाले तर त्याचा फायदा भाजपाला मिळेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अर्थात, आपल्यामुळे भाजपाला फायदा होईल हे ओवेसींना मान्य नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाणा, पंजाब अशा अनेक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये MIM उतरली नव्हती तरीही भाजपा विजयी झाल्याचा दाखला त्यांनी दिला आहे.
बिहगारमध्ये मुस्लीमांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के असून सीमांचलमधल्या किशनगंजसारख्या मतदारसंघांमध्ये ती ७० टक्के आहे. काही मतदारसंघांमध्ये ती २५ ते ४० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे सीमांचलमधल्या एकूण ३७ विदानसभेच्या जागांसाठी तिरंगी लढती होतील आणि निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापून धार्मिक रंग येईल अशीही चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे २०१० च्या निवडणुकांमध्ये १९ मुस्लीम आमदार निवडून आले होते, आणि जवळपास ३५ ठिकाणी मुस्लीम उमेदवार अवघ्या २९ ते १००० मतांनी हरले होते हे बघता MIM चं बिहारमधल्या निवडणुकीत उतरणं वैशिष्ट्यपूर्ण मानण्यात येत आहे.
काय आहे सीमांचलचं वैशिष्ट्य:
- किशनगंज, कटिहार, अरारिया, पुर्णिया, माधेपुरा, सहरसा व सुपौल हे जिल्हे सीमांचलमध्ये येतात.
- बिहारमध्ये मुस्लीमांचे प्रमाण १७ टक्के असले तरी सीमांचलमध्ये ते सगळ्यात जास्त आहे. विधानसभेच्या काही जागांमध्ये तर ते ७० टक्के आहे.
- देशातला सगळ्यात मागासलेला भाग अशी सीमांचलची ओळख आहे.
- शिक्षण, उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा अशा सगळ्या क्षेत्रांच्या बाबतीत सीमांचल मागास आहे.
- काँग्रेस, जनता दल, राष्ट्रीय जनता दल, भाजपा अशा सगळ्याच पक्षांनी सीमांचलकडे दुर्लक्ष केल्याचा ओवेसी यांचा आरोप आहे.
- २०१०च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचलमधल्या २३ पैकी १३ जागा भाजपाने जिंकल्या होत्या, अर्थात त्यावेळी जनता दल NDA मध्ये होता.
- परंतु, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बिहारमधल्या ४० पैकी ३२ जागा जिंकलेल्या भाजपाला सीमांचलमधल्या चारपैकी एकाही जागी विजय मिळालेला नव्हता. यावेळी नितिशकुमारांच्या जनता दलाने NDA ची साथ सोडली होती.
- MIM मुळे मुस्लीम मतांचे विभाजन झाले तर हातातून गमावलेला सीमांचल पुन्हा भाजपाला जिंकता येईल अशी एक शक्यता आहे.