"१५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर अत्याचार, व्हिडीओ आला नसता तर PM बोलले नसते"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:56 PM2023-07-20T16:56:28+5:302023-07-20T16:56:59+5:30
manipur violence news : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं.
Manipur Violence । नवी दिल्ली : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनं अनेकांना धक्का बसला. मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून छळ करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरून पंतप्रधाननरेंद्र मोदींसह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. नरेंद्र मोदी यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मोदींच्या या आश्वासनानंतर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारला उशीरा जाग आली असल्याचे म्हटले.
ओवेसी म्हणाले की, अखेर मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं. दोन महिन्यांनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पण त्या संतापजनक व्हिडीओवर पंतप्रधान मोदी प्रतिक्रिया देतील का, या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे. मणिपूरमध्ये १६० लोक मारले गेले, ज्या अनेक महिलांवर बलात्कार झाला आणि ५० हजारहून अधिक लोक बेघर झाले, त्यांना भाजपचे मुख्यमंत्री न्याय देतील का?, असा प्रश्नही ओवेसींनी केला.
तसेच व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून पंतप्रधानांना प्रतिक्रिया देणे भाग पडले. असं झालं नसतं तर त्यांनी प्रतिक्रिया दिली नसती. मणिपूरमध्ये १५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर शेतात नेऊन अत्याचार केला जातो यावर मोदी काय बोलणार का? तेथील मुख्यमंत्र्यांना हटवले जाईल आणि पंतप्रधान सीबीआय चौकशीचे आदेश देतील तेव्हाच पीडितांना न्याय मिळेल, असेही ओवेसींनी नमूद केले.
अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश
मणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. यातच, घटनेतील मुख्य आरोपीला थाउबल येथून अटक केल्याचेही समजते. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे.