'मिमिक्री ही एक कला, उपराष्ट्रपतींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता'; कल्याण बॅनर्जींची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:06 PM2023-12-20T12:06:20+5:302023-12-20T12:08:43+5:30
कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलच तापलं आहे.
संसदेत झालेल्या घुसखोरीवरून आक्रमक भूमिका मांडणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाचा सपाटा सुरू आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत मागील काही दिवसांत तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर संसद परिसरात काल विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. मात्र या आंदोलनादरम्यान टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली.
कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. तसेच यावर आता स्वत: कल्याण बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपराष्ट्रपतींबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. मिमिक्री ही एक कला आहे. पंतप्रधानांनी देखील मिमिक्री केली होती. माझा त्यांना दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा हेतू नव्हता. तसेच माफी मागणार की नाही या प्रश्नावर त्यांनी 'No' असं उत्तर दिलं.
#WATCH | TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar in Parliament premises pic.twitter.com/naabLIzibY
— ANI (@ANI) December 19, 2023
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संसद परिसरात खासदारांनी केलेली घृणास्पद कृती वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी मागील २० वर्षांपासून सातत्याने असा अपमान सहन करत आहे. मात्र भारताच्या उपराष्ट्रपतीपदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत संसद परिसरात अशी कृती होणं दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले," अशी माहिती उपराष्ट्रपतींनी त्यांच्या 'एक्स' हँडलवरून दिली आहे.
संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनादरम्यान मंगळवारी ही घटना पाहायला मिळाली. तेव्हा तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी धनखर यांची खिल्ली उडवत त्यांची नक्कल केली होती. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवताना दिसले. यावर एक खासदार खिल्ली उडवत आहे आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवत आहे हे हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. अधोगतीला मर्यादा नाही. मी टीव्हीवर एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये एक मोठा नेता व्हिडिओ बनवत आहे, तर दुसरा खासदार माझी नक्कल करत आहे, असं धनखड यांनी सांगितले.