मन प्रसन्न आहे, काम करण्याची माझी क्षमता आजही अबाधित : अडवाणी

By admin | Published: April 14, 2017 04:30 PM2017-04-14T16:30:24+5:302017-04-14T16:30:24+5:30

कार्यक्षमता आणि वयाचा काही संबंध नाही. मन प्रसन्न असले, काम करण्याची इच्छा असली तर वय आडवे येत नाही.

The mind is happy, my ability to work still unabated: Advani | मन प्रसन्न आहे, काम करण्याची माझी क्षमता आजही अबाधित : अडवाणी

मन प्रसन्न आहे, काम करण्याची माझी क्षमता आजही अबाधित : अडवाणी

Next

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 14 : कार्यक्षमता आणि वयाचा काही संबंध नाही. मन प्रसन्न असले, काम करण्याची इच्छा असली तर वय आडवे येत नाही. माझ्याच पक्षातले लोक जेव्हा अशी चर्चा करतात की माझे वय झाले आहे आणि आता मी विश्रांती घेतली पाहिजे, तेव्हा मात्र मन खट्टू होते. माझ्याबाबत कोणी असे बोललेले मला आवडत नाही. नोव्हेंबर महिन्यात वयाची ९0 वर्षे मी जरूर पूर्ण करणार आहे, मन पूर्वीइतकेच आजही प्रसन्न आहे, काम करण्याची माझी क्षमता अजूनही अबाधित आहे. हे उद्गार आहेत माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींचे. राष्ट्रपतीपदाच्या लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला.
दिल्लीत अडवाणींची ३0 पृथ्वीराज रोड येथील त्यांच्या निवासस्थानी प्रस्तुत प्रतिनिधीने भेट घेतली तेव्हा नुकतीच वाचलेली पुस्तके, अलीकडे पाहिलेले चित्रपट, देशाचे राजकारण इत्यादी विषयांवर जवळपास अर्धा तास दिलखुलासपणे अडवाणींनी आपली मते व्यक्त केली. या अनौपचारिक मुलाखतीच्या वेळी अडवाणींच्या कन्या प्रतिभा अडवाणी, लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता उपस्थित होते.
देशाच्या विद्यमान राजकारणाविषयी बोलण्यास अडवाणी फारसे उत्सुक नव्हते मात्र अन्य राजकीय पक्षांच्या विद्यमान स्थितीविषयी विचारले असता सहजपणे अडवाणी म्हणाले, राजकारणात चढउतार होतच असतात. एकेकाळी भाजपचे अवघे २ खासदार लोकसभेत होते. आज आमचा पक्ष पूर्ण बहुमतासह केंद्राच्या सत्तेत आहे. देशाच्या लोकजीवनात दीर्घकाळ लोकसंपर्कात असलेला राजकीय पक्ष कधी संपत नसतो. काही लोक बोलतात की काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालले आहे. मला मात्र असे अजिबात वाटत नाही. राजकारणात असा काळ प्रत्येक पक्षाला कधी ना कधी पहावाच लागतो.
अडवाणी चित्रपटांचे शौकीन आहेत. त्यांनी अलीकडेच पाहिलेल्या चित्रपटांमधे फोगाट भगिनींच्या सत्यकथेवर आधारीत आमिरखानचा दंगल व देव पटेल अभिनित लायन हे दोन चित्रपट मनापासून भावले, असे नमूद करीत अडवाणी म्हणाले, ह्यलायन ची सत्यकथा मनाला स्पर्श करणारी आहे. ओडिशात एक ४ वर्षांचा मुलगा आईवडिलांपासून अचानक दुरावतो. भारतापासून दूर परदेशात त्याला नेले जाते. एक आॅस्ट्रेलियन दांपत्य त्याचा सांभाळ करते व वयाच्या २७ व्या वर्षी गुगल अर्थ व गुगलवरून मिळवलेल्या माहितीच्या आधारे ओडिशातील आपले हरवलेले कुटुंब तो शोधून काढतो. त्याच्या आयुष्यातले थ्रील देव पटेलच्या अभिनयातून उत्तमप्रकारे साकार झाले आहे. चित्रपट इतका आवडला की लायन चे मूळ कथानक असलेले पुस्तक मी खरेदी केले आणि पुन्हा वाचून काढलेह्ण.
मुलाखतीच्या दरम्यान आपल्या व्यक्तिगत लायब्ररीतील १४ हजार ग्रंथांच्या अलौकिक संपदेचे दर्शन अडवाणींनी घडवले. प्रणव मुखर्जींनी राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत राष्ट्रपती भवनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारे १३ कॉफी टेबल बुक्स प्रकाशित केले आहेत. स्वत: मुखर्जींनी हा संग्रह अडवाणींना भेट दिला तो दाखवतांना अडवाणी म्हणाले, राष्ट्रपती भवनाचे सारे अंतरंग उलगडून दाखवणारी इतकी महाग ग्रंथसंपदा सामान्य लोक खरेदी करू शकणार नाहीत. याच ग्रंथांचे छोट्या आकाराच्या पॉकेटबुक्समधे रूपांतर केल्यास भारताच्या घराघरात अलौकिक माहितीचा हा खजिना पोहोचू शकेल. इंग्रजी सिंधी शब्दकोशाची देवनागरी भाषेतील जुनी आवृत्ती दाखवतांना काही काळ अडवाणी शालेय जीवनातल्या जुन्या आठवणींमधे रमले. ते म्हणाले, ह्यसिंध प्रांतात कराचीच्या सेंट पॅट्रीक हायस्कुलमधे मी शिकत होतो. त्या शाळेत हिंदु, सिंधी, पारशी, ज्यु, ख्रिश्चन आदी विद्यार्थ्यांचा भरणा होता मात्र एकही मुस्लिम विद्यार्थी त्यात नव्हता.कारण मुस्लिम समुदायात शिक्षणाचे प्रमाण त्याकाळी अतिशय कमी होते. लायब्ररीतून हिंडतांना समग्र पंडित दिनदयाल उपाध्यायांचे २0 खंड, हिंदुइझम एनसायक्लोपिडियाचे अनेक खंड अशी कपाटांमधे नेटकेपणाने लावलेली ग्रंथसंपदाही अडवाणींनी आवर्जून यावेळी दाखवली. अडवाणींचे ग्रंथप्रेम त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होते. वाचलेल्या ग्रंथांवर स्वत:चे अभिप्राय अडवाणींनी या पुस्तकांवर स्वत:च्या हस्ताक्षरात नोंदवून ठेवले आहेत.

Web Title: The mind is happy, my ability to work still unabated: Advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.