कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य, केंद्र सरकारचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 03:49 AM2018-02-03T03:49:05+5:302018-02-03T03:49:37+5:30
कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली. यामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
लासलगाव (जि. नाशिक) : कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली. यामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
जानेवारीच्या तिसºया सप्ताहात केंद्राने कांद्याचे किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, वाढलेली आवक यामुळे गेला सप्ताहभर कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण होत होती. लासलगावच्या कांदा बाजारामध्ये मागच्या सोमवारी तर सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला होता. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले. परंतु श्रीलंका वगळता अन्य कोणत्याही देशामध्ये सध्या कांद्याची निर्यात सुरू नव्हती. यानंतर कांद्याचे निर्यातमूल्य हटवण्यात यावे यासाठी राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनीही केंद्राकडे पाठपुरावा केला होता. सरकारने निर्यातीला वेसण घालून देशी बाजारात कांदा रहावा म्हणून किमान निर्यातमूल्य ८५० डॉलर प्रतिटन केले होते. त्यानंतर ते ७०० डॉलर प्रतिटन असे खाली आले.
सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून
भारतातील एकूण कांदा निर्यातीत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरीत २० टक्यांमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो. यंदाही सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून झालेली आहे. यापैकी ७५ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे.