किमान हमीभावाची मागणी पूर्ण व्हावी; महापंचायतीत शेतकऱ्यांची मागणी, केंद्राविरोधात घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 05:25 AM2024-03-15T05:25:19+5:302024-03-15T05:25:32+5:30
ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीत आणण्यास मनाई
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या कृषी क्षेत्राबाबतच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आयोजित ‘किसान मजदूर महापंचायत’मध्ये भाग घेण्यासाठी गुरुवारी येथील रामलीला मैदानावर शेतकरी मोठ्या संख्येने जमले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घोषणाबाजी केली.
२०२०-२१ मध्ये दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) या शेतकरी संघटनांच्या एक छत्री संघटनेने ‘किसान मजदूर महापंचायत’मध्ये एक ठराव मंजूर केला जाईल, असे म्हटले होते. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
केंद्राची धोरणे शेतकरी समर्थक असावीत, अशी आमची इच्छा आहे. पिकांवर किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ही आमची मागणी पूर्ण व्हावी, अशी मागणी पंजाबच्या पटियाला येथील शेतकरी हरमन सिंग यांनी केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भडकलेल्या हिंसाचारातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, असे भटिंडा येथील शेतकरी रविंदर सिंग म्हणाले.
ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीत आणण्यास मनाई
- शेतकऱ्यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्य दिल्लीकडे जाणारे रस्ते टाळण्यासाठी प्रवाशांसाठी वाहतूक सल्ला जारी केला आहे. दिल्लीच्या सीमेवर तैनात असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांची संख्याही वाढवण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांनी त्यांच्या ट्रॅक्टर- ट्रॉलींसह राजधानीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केली आहे. दिल्ली पोलिसांनी ५,००० पेक्षा जास्त लोकांचा मेळावा होणार नाही, या अटीवर शेतकऱ्यांना कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर- ट्रॉली दिल्लीत न आणण्यास आणि रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यास सांगण्यात आले आहे.