"अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध काम केले होते, मुख्यमंत्री ऐकत नाहीत", अनिल विज यांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:48 IST2025-02-03T14:47:51+5:302025-02-03T14:48:01+5:30
मंत्री अनिल विज म्हणाले, आपल्या पक्षाने आणि सरकारने योग्यरित्या काम केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदार, मंत्री आणि जनतेचे ऐकले पाहिजे.

"अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध काम केले होते, मुख्यमंत्री ऐकत नाहीत", अनिल विज यांची नाराजी
हरयाणाचे वीज आणि वाहतूक मंत्री अनिल विज यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. अनिल वीज यांनी मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. मंत्री अनिल विज म्हणाले, निवडणुकीदरम्यान माझ्या अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध काम केले होते. आता शंभर दिवस झाले आहेत, परिस्थिती बदलली आहे की, नाही. याने काहीही फरक पडणार नाही. आपल्या पक्षाने आणि सरकारने योग्यरित्या काम केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदार, मंत्री आणि जनतेचे ऐकले पाहिजे.
अनिल विज यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, मुख्यमंत्री तुमचे काय ऐकत नाहीत? असा सवाल अनिल विज यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, जर मी बोलत असेल तर त्यांनी माझे ऐकले पाहिजे. तसेच, कॅबिनेट मंत्री श्याम सिंह यांनी केलेल्या दाव्याबद्दलही अनिल विज यांनी सविस्तर भाष्य केले. अनिल विज म्हणाले, "श्याम सिंह यांची सुनावणी सुरू झाली आहे ही चांगली गोष्ट आहे, पण १० दिवसांपूर्वी श्याम सिंह यांनी स्वतः मला फोन करून सांगितले होते की, यमुना नगरचे अधिकारी माझे ऐकत नाहीत. तुम्ही एकदा बोलून बघा."
मंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर अनिल विज म्हणाले, "मी काहीही केलेले नाही. मी सरकारी बंगला घेतलेला नाही. फक्त एकच गाडी आहे. माझ्या मित्रांनी सांगितले की, गाडी हिसकावून घेतली जाईल. आम्ही ती गाडीही देऊ. जर ते मंत्रीपद हिसकावून घेऊ शकत असतील तर ते सुद्धा करू देत, पण आमदारपद हिसकावून घेऊ शकत नाहीत." दरम्यान, गेल्यावर्षी हरयानामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत अनिल विज यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र, त्याऐवजी नायबसिंह सैनी यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेले ७१ वर्षीय अनिल विज यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत अंबाला कँट मतदारसंघातून अनिज वीज हे ७२७७ मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसने अंबाला कँट मतदारसंघातून कुमारी शैलजा यांचे निकटवर्तीय परविंदर सिंग परीला उमेदवारी दिली होती.