'मंत्री चेतन चौहान यांचा मृत्यू कोरोनामुळे नाही, तर हॉस्पीटलच्या निष्काळजीपणामुळे'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 01:03 PM2020-08-23T13:03:53+5:302020-08-23T13:05:32+5:30
चेतन चौहान यांना जुलै महिन्यात कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी, संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
लखनौ - भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे 16 ऑगस्ट रोजी रविवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. चेतन चौहान यांना मागील महिन्यात कोरोनाचीही लागण झाली होती. पण, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचा भाऊ पुष्पेंद्र चौहान यांनी दिली. मात्र, केतन चौहान यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आमदार सुनिलसिंह साजन यांनी केला आहे.
चेतन चौहान यांना जुलै महिन्यात कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी, संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती ढासळल्याने गुरूग्राम मधील मेदांता रुग्णालयात त्यांना शिफ्ट करण्यात आले. त्यातच, किडनी फेल झाल्यानंतर त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी, उत्तर प्रदेशातीलआमदार सुनिलसिंह सजन यांनी चेतन चौहान यांच्यावरील उपचारासंदर्भात रुग्णालय प्रशासनला जबाबदार धरले आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे चौहान यांच्यावरील उपचार व्यवस्थीत झाले नसून रुग्णालय प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप सजन यांनी केला आहे. तसेच, रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफने त्यांना आदराची वागणूक दिली नसल्याचेही साजन यांनी म्हटलेय दरम्यानच्या काळात चौहान आणि मी एकाच वार्डमध्ये उपचार घेत होतो, असा दावाही त्यांनी केला आहे. रुग्णालयातील घडलेला एक प्रसंगही त्यांनी सांगितला आहे.
चेतन चौहान यांना रुग्णालयात दाखले केल्यानंतर डॉक्टर व स्टाफ तेथे आला होता. चेतन कोण? अशी विचारणाही त्या स्टाफने केली. त्यावेळी, चेतन यांनी हात वरुन करुन इशारा केला. मग, डॉक्टरांनी कोरोनाची लागण कशी झाली, याबद्दल विचारले. तसेच, काय करता हेही विचारले. त्यावेळी, मी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रालयात मंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या या वागण्यामुळे आपण त्यांच्यावर चिडलो आणि हे चेतन चौहान आहेत, ज्यांनी देशासाठी क्रिकेट खेळलंय, असं मी त्यांना सांगितल्याचं सुनिलसिंह यांनी म्हटले. त्यानंतर, डॉक्टरांनी ओह्रहह चेतन .. असे म्हणत ओळख दर्शवली व ते निघून गेले, असेही सिंह यांनी म्हटले.
सुनिल सिंह यानी विधानपरिषदेत बोलताना रुग्णालया प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. चेतन चौहान आणि सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावांची भागीदारी केली असून त्यांच्या नावावर 10 शतकी भागीदारी आहेत. 1979 साली कसोटीत त्यांनी ओव्हलवर 213 धावांची भागीदारी करून विजय मर्चंट आणि मुश्ताक अली यांचा 203 धावांचा विक्रम मोडला होता. कसोटीत 2000 हून अधिक धावा करूनही एकही शतक नावावर नसलेले ते एकमेव खेळाडू आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 179 सामन्यांत 40.22 च्या सरासरीनं 21 शतकं आणि 59 अर्धशतकांसह 11 हजार धावा केल्या.