India Taliban Talks: अफगाणिस्तानमधील स्थितीवर सर्वपक्षीय बैठक; तालिबानी हालचालींवर भारताची भूमिका ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 01:05 PM2021-08-26T13:05:35+5:302021-08-26T13:07:00+5:30
विविध राजकीय पक्षांच्या सभागृहातील नेत्यांना अफगाणिस्तानात सुरु असलेल्या बचाव मोहिमेची माहिती दिली जात आहे.
नवी दिल्ली – अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबानची(Taliban) सत्ता आल्यानंतर जगातील राजकीय वातावरण बदललं आहे. चीननं त्यांचा डाव खेळला आहे. रशिया आणि पाकिस्तानही पडद्यामागून त्यांची रणनीती आखत आहे. तालिबानसोबतभारताची चर्चा सुरु आहे परंतु अधिकृतपणे काहीही सांगता येत नाही. भारतानं सौम्य भूमिका घेत सर्व पर्याय खुले ठेवण्याचे संकेत दिले आहेत. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. ज्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आढावा देतील.
विविध राजकीय पक्षांच्या सभागृहातील नेत्यांना अफगाणिस्तानात सुरु असलेल्या बचाव मोहिमेची माहिती दिली जात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना कसं आणि कधी परत आणलं जाईल. आतापर्यंत किती आले अजून किती बाकी आहेत. किती अफगाणी नागरिकांना वाचवलं आहे. अल्पसंख्याक समुदायाचे किती आहेत. तालिबानसोबतची चर्चा आणि अफगाणिस्तानात भारतीय गुंतवणुकीच्या सुरक्षेसारख्या अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणार आहे.
#WATCH Delhi | External Affairs Minister Dr S Jaishankar briefs all-party panel over the present situation in Afghanistan pic.twitter.com/AhyaggYDV1
— ANI (@ANI) August 26, 2021
भारत घेणार सौम्य भूमिका
सूत्रांच्या माहितीनुसार, भारत तालिबानसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मागे हटणार नाही. देशहितावर प्राधान्य दिलं जाईल. मागील १० दिवसांचा घटनाक्रम पाहिला तर त्यात वेगाने घडामोडी बदलत आहेत. भारताने अद्याप तटस्थ भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जगातील ताकदवान देश स्पष्ट शब्दात तालिबानला आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकानुसार शासन चालवणार असेल तर मान्यता देईल तेव्हाच सौम्य भूमिका घेतली जाईल. मानवाधिकार अंतर्गत महिलांचा अधिकारावर तालिबान त्यांच्या जुन्या भूमिकेत बदल करेल आणि सुधारणा करेल.
निष्पक्षपणे चर्चा करण्याच्या अटीवर भारतासोबत संवाद - तालिबान
तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहैल शाहीन यांनी मागील काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, भारत आणि तालिबान यांच्यात कुठलीही चर्चा झाली नाही. निष्पक्षपणे चर्चा होणार असेल तर भारताशी संवाद साधला जाईल. दोहा करारानुसार, तालिबान कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेला अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर जगातील इतर देशांविरोधात हल्ला करण्यासाठी देणार नाही हे स्पष्ट आहे.
भारताकडे प्लॅन B?
जर तालिबानसोबत सरळ चर्चा होणार नसेल तर बॅकडोर डिप्लोमेसीचा पर्याय भारताकडे खुला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल मागील दोन आठवड्यापासून खास सक्रीय झाले आहेत. त्यांनी BRICS देशांमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांशी अफगाणिस्तान मुद्द्यांवर चर्चा केली आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यासोबतही डोभाल यांचा संवाद झाला आहे. मागील आठवड्यात सुरक्षेवर कॅबिनेट समितीसमोर डोभार यांनी सर्व माहिती समोर ठेवली आहे.
तालिबान बदललं नाही, इमरजेन्सी प्लॅन तयार – CDS
तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले की, तालिबान २० वर्षात बदलला नाही केवळ त्याचे सहकारी बदललेत. तालिबान हा २० वर्षापूर्वीचा आहे. तालिबान तोच आहे परंतु त्याचे सहकारी बदललेत. अफगाणिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हालचाली भारतासाठी चिंतेच्या आहेत. अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात ज्या वेगाने बदल घडला त्यामुळे आम्ही आश्चर्यचकीत आहोत. त्यामुळे आम्ही देखील इमरजेन्सी योजना आखल्या आहेत. त्यासाठी तयार आहोत असं जनरल रावत यांनी सांगितले आहे.