नवा वाद! केजरीवालांच्या मागे दिसणाऱ्या राष्ट्रध्वजात हिरव्या रंगाला अधिक स्थान; केंद्रीय मंत्र्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 12:34 PM2021-05-28T12:34:24+5:302021-05-28T12:37:06+5:30
देश कोरोना संकटाचा सामना करत असताना दिल्ली सरकार आणि केंद्रातलं भाजप सरकार पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभं ठाकलेलं पाहायला मिळत आहे.
देश कोरोना संकटाचा सामना करत असताना दिल्ली सरकार आणि केंद्रातलं भाजप सरकार पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभं ठाकलेलं पाहायला मिळत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केला आहे. यासंदर्भात पटेल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहून केजरीवालांची तक्रार केली आहे.
"गेल्या काही दिवसांपासून मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद पाहातोय. त्यांच्या मागे दोन राष्ट्रध्वज दिसतात. त्यात सफेद रंगाचं स्थान कमी करुन हिरव्या रंगाला जास्त स्थान देण्यात आल्याचं दिसून आलं आहे. यासंदर्भात मी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे आणि उपराज्यपालांनाही पत्र पाठवलं आहे", असं केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितलं.
अरविंद केजरीवाल जेव्हा पत्रकार परिषद घेतात तेव्हा त्यांच्या मागे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजांमध्ये हिरव्या रंगाचं स्थान अधिक देण्यात आलं आहे आणि हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियमांचं उल्लंघन आहे, असंही पटेल यांनी पत्रात नमूद केलं आहे. यात तात्काळ सुधारण्याची मागणी देखील पटेल यांनी केली आहे.
कोरोना काळात मुख्यमंत्री केजरीवाल अनेकदा पत्रकार परिषद घेऊन जनतेला सविस्तर माहिती देत असतात. यात डिजिटल माध्यमातून ते अनेकदा पत्रकार परिषद घेत असतात. प्रत्येक पत्रकार परिषदेत त्यांच्या मागे दोन राष्ट्रध्वज पाहायला मिळतात. याच राष्ट्रध्वजांमधून नियमांचं उल्लंघन केजरीवाल करत असल्याचं केंद्रीय मंत्री पटेल यांचं म्हणणं आहे.