करोना लशीची स्वत:वर चाचणी करण्याची मंत्र्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 04:36 PM2020-11-18T16:36:49+5:302020-11-18T16:40:44+5:30
करोना लशीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात समावेश होण्यासाठीची इच्छा अनिल विज व्यक्त केली आहे. हरियाणात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
चंदीगढ
करोना विरुद्धच्या लढ्यात लस तयार करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. देशात काही ठिकाणी लशीची चाचणी देखील सुरू झाली आहे. यात हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी स्वत:वर करोना लशीची चाचणी करण्यास तयारी दर्शवली आहे.
करोना लशीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात समावेश होण्यासाठीची इच्छा अनिल विज व्यक्त केली आहे. हरियाणात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 'दिल्लीत करोनाचे रुग्ण वाढण्यासाठी हरियाणाला दोषी ठरवणाऱ्या आम आदमी पक्षाने आधी करोनाला कसं संपवता येईल याबाबत विचार करण्याची गरज आहे. करोनापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजना करुन दैनंदीन जीवन जगण्याला प्राधान्य द्यायला हवं', असं अनिल विज म्हणाले. यासोबतच लॉकडाउन संदर्भात कठोर पावलं उचलण्याचीही तयारी असल्याचं ते म्हणाले.
भारत बायोटेकने करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. यात भारतामध्ये २५ केंद्रांमध्ये एकूण २६ हजार जणांवर याची चाचणी होणार आहे. भारतीय वैद्यकीय संसोधन संस्थेच्या देखरेखीखाली या चाचण्या होत आहेत. चाचणी करण्यात येणाऱ्यांवर पुढील वर्षभर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोविड-१९ च्या लशीची भारतात झालेली ही सर्वात मोठी चाचणी ठरणार आहे.