नागरी उड्डाण राज्यमंत्र्यांनाच विमानात स्नॅक्स नाकारलं गेलं, अन्....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 04:58 PM2018-11-21T16:58:50+5:302018-11-21T17:05:55+5:30
एअर एशियाच्या विमानात घडला प्रकार
नवी दिल्ली: केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या एका कृतीनं सोशल मीडियाची मनं जिंकली आहेत. जयंत सिन्हा 20 नोव्हेंबरला दिल्लीहून रांचीला जात होते. त्यावेळी त्यांनी एअर एशियाच्या विमानातून प्रवास केला. त्यांचा हा विमान प्रवास सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या प्रवासादरम्यान जयंत सिन्हा यांनी नाश्ता ऑर्डर केला होता. मात्र विमानातील कर्मचाऱ्यानं त्यांना नकार दिला. यानंतरही सिन्हा अतिशय शांत होते. विमानात घडलेला हा किस्सा सिन्हा यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाशानं ट्विटरवर शेअर केला आहे.
जयंत सिन्हा यांनी विमान प्रवासा दरम्यान नाश्ता मागवला. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांना त्यांना नकार दिला. तुम्ही तिकीट आरक्षित करताना दक्षिण भारतीय जेवण ऑर्डर केलं होतं. त्यामध्ये नाश्त्याचा समावेश होत नाही. त्यामुळे आता तुम्हाला नाश्ता हवा असल्यास त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील, असं कर्मचाऱ्यानं नम्रपणे सिन्हा यांना सांगितलं. यानंतर सिन्हा यांनी कोणताही बडेजाव न दाखवता अतिशय शांतपणे नाश्त्याचे पैसे कर्मचाऱ्याला दिले. हा संपूर्ण प्रकार सिन्हा यांच्या शेजारी बसलेल्या असद राशिद नावाच्या प्रवाशानं ट्विटरवर शेअर केला आहे.
— Jayant Sinha (@jayantsinha) November 20, 2018
असद राशिद यांच्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अनेकांनी सिन्हा यांच्या शांत आणि संयमीपणाचं कौतुक केलं आहे. केंद्रीय मंत्री असूनही त्याचा कोणताही अहंकार न बाळगणाऱ्या सिन्हा यांच्यावर खूप जणांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. विशेष म्हणजे राशिद यांचं ट्विट जयंत सिन्हा यांनी रिट्विट केलं आहे. यासोबत सिन्हा यांनी एक स्माईली वापरला आहे. सिन्हा यांच्याकडून इतर राजकारण्यांनी धडे घ्यावेत, असा सल्ला अनेकांनी राशिद यांचं ट्विट रिट्विट करताना दिला आहे.