राज्यमंत्र्यांना ‘अच्छे दिन’
By admin | Published: July 25, 2016 04:12 AM2016-07-25T04:12:21+5:302016-07-25T04:12:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरा तोडत केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांना भरीव काम देऊ केले असून, अनेक फायली आता त्यांच्यामार्फत हातावेगळ््या केल्या जात आहेत
हरीश गुप्ता ल्ल , दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरा तोडत केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांना भरीव काम देऊ केले असून, अनेक फायली आता त्यांच्यामार्फत हातावेगळ््या केल्या जात आहेत. मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारानंतर पंतप्रधान कार्यालयाने कॅबिनेट व राज्यमंत्र्यांच्या कामाची काटेकोर आखणी करून दिली आहे. ज्येष्ठ मंत्र्यांच्या हाताखाली कनिष्ठ मंत्र्यांना शिकण्याची संधी मिळावी व त्यांच्यात भविष्यात नेतृत्त्व करण्याचे गुण बाणविले जावेत यासाठी मोदींनी राज्यमंत्र्यांनाही निश्चित कामे वाटून दिली आहेत.
पंतप्रधानांच्या कार्यालयाने २६ कॅबिनेटमंत्र्यांना असे स्पष्ट संकेत दिले आहेत की, पंतप्रधानांशी संपर्क साधल्याशिवाय त्यांनी कोणतेही कामाचे वाटप करू नये. अर्थात, अनेक मंत्री आपल्या राज्यमंत्र्यांना पुरेसे काम देत नाहीत, हेही त्यांना माहीत आहे व त्यासाठी या कॅबिनेटमंत्र्यांनी पावले उचलणे पंतप्रधानांना अभिप्रेत आहे. अनेक राज्यमंत्र्यांना अजून त्यांच्या कामासंदर्भात रीतसर आदेशच हाती पडायचा आहे. प्रत्येक कॅबिनेटमंत्र्याने आपल्या राज्यमंत्र्याला काय काम दिले, याची माहिती पीएमओला देणे अपेक्षित आहे व त्याबाबत साऊथ ब्लॉकच्या निर्णयाची वाट पाहणे क्रमप्राप्त आहे. याबाबत अनेक मंत्र्यांनी पाठवलेल्या फायली परतही आलेल्या आहेत, तर काहींना त्याची प्रतीक्षा आहे.
तथापि, गृह, संरक्षण, नागरी हवाई वाहतूक, रसायने व खते, संसदीय कार्य या प्रमुख खात्यांसह, अनंत गीते, हरसिमरत कौर बादल, जुअल ओरान, राधामोहनसिंग, थावरचंद गेहलोत व हर्षवर्धन यांना फारशी समस्या येण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांची संख्या फारशी बदललेली नाही. आधीचे राज्यमंत्री बदलले किंवा वगळले आणि त्यांच्या जागी दुसरे आले तर कामाचे वाटप तसेच राहते, परंतु वित्त (अरुण जेटली), रेल्वे (सुरेश प्रभू), रस्ते वाहतूक व जहाजबांधणी (नितीन गडकरी), लघु, मध्यम उद्योग (कलराज मिश्र), आरोग्य (जे.पी. नड्डा) मंत्रालयांना जास्तीचे राज्यमंत्री देण्यात आले आहेत. यापैकी काहींना अडचण येण्याची शक्यता आहे.
अरुण जेटली यांना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासाठी राज्यमंत्री देण्यात आले आहेत. त्यांच्या खात्याचे दोन्ही राज्यमंत्री संतोष गंगवार आणि अर्जुन राम मेघवाल हे खासकरून हिंदीभाषी आहेत. उच्चस्तरीय मंडळे, शिष्टमंडळे आणि आंतरराष्ट्रीय संघटना, परिषदांशी जुळवून घेण्यास त्यांना वेळ लागत आहे. तथापि, दोघेही खूश आहेत. सुषमा स्वराज या बाबतीत फारच आघाडीवर आहेत. त्यांनी आपल्या परराष्ट्रव्यवहार खात्याच्या कामाचे तातडीने वाटप करून एम.जे. अकबर यांना समाधानकारक काम दिले, तसेच अनेक वाद उभे करणारे जन. व्ही. के. सिंग यांनाही अतिरिक्त काम दिले. रसायने आणि खते मंत्रालयातून गृहमंत्रालयात आलेले हंसराज अहीर यांना राजनाथसिंग यांनी हवे ते काम दिले आहे.