लैंगिक छळ रोखण्यासाठी मंत्रीगट; प्रमुख अमित शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 04:19 AM2019-07-25T04:19:09+5:302019-07-25T04:19:14+5:30
सीतारामन, पोखरियाल, स्मृती इराणी सदस्य
नवी दिल्ली : कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचा होणारा लैंगिक छळ थांबविण्यासाठी, तसेच त्याबद्दलचे कायदे अधिक कडक करण्याकरिता नेमलेल्या मंत्रीगटाची केंद्र सरकारने फेररचना केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता या मंत्रीगटाचे प्रमुख असणार आहेत.
याआधी राजनाथसिंह गृहमंत्री असताना ते या मंत्रीगटाचे प्रमुख होते. फेररचना केलेल्या मंत्रीगटात वित्तमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय बालविकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांचा सदस्य म्हणून समावेश केला आहे. याआधीच्या मंत्रीगटात तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, महिला व बालविकास खात्याच्या मंत्री मनेका गांधी यांचा समावेश होता.
कामाच्या ठिकाणी महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना मानसिक त्रास व लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता केंद्र सरकारने एका मंत्रीगटाची आॅक्टोबर २०१८ मध्ये स्थापना केली होती. कायदे करूनही हे प्रकार कमी होण्याचे चिन्ह नाही. कायद्याच्या बडग्याबरोबरच समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील यावरदेखील या मंत्रीगटातील सदस्य विचार करतात.
लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. केंद्रात नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीगट, समित्यांची फेररचना केली जाते. अमित शहा प्रमुख असलेल्या या मंत्रीगटाच्या सदस्यांची लवकरच बैठक बोलावणार आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.