मंत्र्यांचा ‘सुवर्ण’ हरताळ!
By admin | Published: November 30, 2015 03:20 AM2015-11-30T03:20:09+5:302015-11-30T03:20:39+5:30
लोकांनी सोन्याचा मोह सोडावा आणि आपापल्या घरात पडून असलेले सोने बँकेत ठेवून, देशाच्या अर्थव्यवस्थेचे सोने करावे, असे कळकळीचे आवाहन करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
लोकांनी सोन्याचा मोह सोडावा आणि आपापल्या घरात पडून असलेले सोने बँकेत ठेवून, देशाच्या अर्थव्यवस्थेचे सोने करावे, असे कळकळीचे आवाहन करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत सुवर्ण ठेव योजनेची सुरुवात केली खरी, पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याने आपल्याकडील एक गुंजभरही सोने या योजनेत गुंतविलेले नाही. परिणामी, सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरातील सुमारे ४३७ किलो सोने हे खुद्द पंतप्रधानांच्या ‘सुवर्ण’ कल्पनेवर अविश्वास दर्शविणारे ठरले आहे.
देशात लोकांच्या घरात व श्रीमंत देवस्थानांकडे असलेले सुमारे २० हजार टन सोने, उत्पादक स्वरूपात अर्थव्यवस्थेत आणण्याच्या उद्देशाने सरकारने सुवर्ण ठेव योजना सुरू केली, पण तिला एवढा अत्यल्प प्रतिसाद मिळाला की, पहिल्या दिवसात जेमतेम ५०० ग्रॅम सोने लोकांनी बँकेत जमा केले आहे. सर्वसामान्य लोकांचे सोडा, पण केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जरी आपल्याकडील सोने बाहेर काढले असते, तरी या योजनेस याहून १००पट अधिक प्रतिसाद मिळू शकला असता. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) मिळालेल्या माहितीनुसार, सर्व केंद्रीय मंत्र्यांकडे मिळून ४३,६६४ ग्रॅमहून अधिक सोने आहे. सर्व केंद्रीय मंत्री आपापल्या स्थावर-जंगम मालमत्तांचे वार्षिक विवरणपत्र ‘पीएमओ’कडे सादर करीत असतात. पुरुष मंत्र्यांपैकी सर्वाधिक सोने वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे, तर पुरुष राज्यमंत्र्यांमध्ये ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आहे. जेटली व कुटुंबाकडे ६.४६ किलो, तर गोयल यांच्याकडे ३.९० कोटी रुपयांचे सोने आहे. भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे २.५२ किलो सोने आहे.
केंद्रीय खाद्यमंत्र्यांकडे साडेपाच कोटींचे सोने
माहिती अधिकार कायद्यान्वये त्याची माहिती घेतली असता, जे चित्र समोर येते ते असे: सर्व केंद्रीय मंत्र्यांमध्ये खाद्य आणि अन्नप्रक्रियामंत्री हरसीमरत सिंग कौर यांच्याकडे सर्वाधिक सोने आहे. 2500 रुपये प्रति ग्रॅम या सध्याच्या बाजारभावानुसार त्यांच्याकडील सोन्याची किंमत सुमारे ५.५ कोटी रुपये आहे. त्याखालोखाल मनेका गांधी, उमा भारती आणि सुषमा स्वराज यांचा क्रम लागतो. मनेका गांधी यांनी १.४७ कोटी
रुपयांचे, तर उमा भारती यांनी ३५ लाख रुपयांचे सोने आपल्याकडे असल्याची माहिती दिली आहे. यात उमा भारती या संन्यासी आहेत, हे लक्षणीय आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ९८७ ग्रॅम सोने जवळ बाळगून आहेत.
>मंत्री व कुटुंबांकडील सोने
मंत्र्याचे नावग्रॅम
नरेंद्र मोदी४५
राजनाथ सिंह७६०
सुषमा स्वराज ९८७
अरुण जेटली ६४६४
व्यंकय्या नायडू ५२०
नितीन गडकरी २०५२
मनोहर पर्रीकर२२०
सुरेश प्रभू १८३३
उमा भारती १४००
नजमा हेपतुल्ला ७००
मनेका गांधी५८८३
रविशंकर प्रसाद४७०
स्मृती इराणी३९८