याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:10 AM2024-05-07T06:10:01+5:302024-05-07T06:10:28+5:30
ईडीचे झारखंडमध्ये छापे : बॅग, सुटकेस, पॉलिथिनमध्ये नोटा
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
रांची : लोकसभा निवडणुकीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी झारखंडची राजधानी रांची येथे पुन्हा एकदा छापे टाकून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या कारवाईत काँग्रेस नेते व झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहायक (पीएस) संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून तब्बल ३० कोटी रुपये जप्त करण्यात आले.
गेल्यावर्षी मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेले झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता बिरेंद्र राम यांच्याशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहायक संजीव लाल यांच्या केवळ १५ हजार पगार असलेल्या नाेकराच्या घरात
नोटांची थप्पी पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावून गेले. नोटा मोजण्यासाठी नोटा मोजण्याची यंत्रे मागविण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, त्यात जप्त करण्यात आलेल्या नोटा घरात कशा ठेवल्या होत्या, हे दिसते.
रांचीत ज्या नऊ ठिकाणी ईडीने छापे टाकले, त्यात रस्ते बांधकाम विभागात कार्यरत सेल सिटीचे अभियंता विकास कुमार यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. याशिवाय, मंत्री आलमगीर आलम यांच्या खासगी सचिवाचे सहायक जहांगीर आलम, मुन्ना सिंह आदींच्या ठिकाणांवर छापे पडले.
रोखव्यतिरिक्त दागिनेही जप्त बॅग, सुटकेस व पॉलिथिनमध्ये नोटांची बंडले ठेवण्यात आली होती. रोखव्यतिरिक्त दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
मंत्री काय म्हणाले?
मंत्री आलमगीर आलम म्हणाले की, संजीव लाल हे सरकारी कर्मचारी आणि आमचे स्वीय सहायक आहेत. आम्ही स्वीय सहायकाची निवड अनुभवाच्या आधारे करतो. जे तुम्ही पाहात आहात, तेच आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहात आहोत. ईडी काय निष्कर्ष काढते ते पाहू.
भाजपचा हल्लाबोल
काँग्रेस संपूर्ण देशाला लुटू इच्छिते. गरिबांना लुटून आपले खिसे भरणे हाच काँग्रेसचा उद्देश आहे. म्हणूनच राहुल गांधी म्हणतात, आम्ही घाबरणार नाही, असे भाजप नेते मजिंदर सिंह म्हणाले. ईडीने गेल्यावर्षी फेब्रुवारीत मुख्य अभियंता बीरेंद्र राम यांच्याशी संबंधित २४ ठिकाणांवर छापे टाकले होते.