संरक्षण मंत्रालय पुन्हा एकदा जेटलींकडे
By admin | Published: March 13, 2017 05:41 PM2017-03-13T17:41:00+5:302017-03-13T17:41:00+5:30
मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार पुन्हा एकदा अरुण जेटलींकडे आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार पुन्हा एकदा अरुण जेटलींकडे आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारताना वित्तमंत्री अरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
याआधी मे 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवला होता. पण 2014 च्या अखेरीस मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यावर मनोहर पर्रीकर यांची संरक्षणमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यावेळी ते केंद्रात येण्यास फारसे उत्सुक नव्हते. पण संरक्षण मंत्रिपद स्वीकारल्यावर पर्रीकर यांनी आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवली होती. मात्र पर्रीकर यांच्या राजीनाम्यामुळे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा जेटलींकडे आली आहे. राष्ट्रपती भवनाकडून ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
पर्रीकर यांनी 2000 ते 2005 आणि 2012 ते 2014 या काळात गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. मात्र 2014 साली त्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यावेळी त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात गोव्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपाने सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी स्थानिक पक्षांनी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास तयारी दर्शवली होती.
Shri Arun Jaitley shall be assigned the charge of the Ministry of Defence, in addition to his existing portfolios
— President of India (@RashtrapatiBhvn) March 13, 2017