मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अॅप्सवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 05:26 PM2020-09-02T17:26:28+5:302020-09-02T17:32:30+5:30
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली: मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पबजीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास १०० हून अधिक मोबाईल अधिक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आणखी ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला आहे.
पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अॅप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. 'या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.
Ministry of Information & Technology bans PUBG and 118 other mobile applications pic.twitter.com/3bnFiaY9VW
— ANI (@ANI) September 2, 2020
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ६९ ए च्या अंतर्गत पबजीसह ११८ मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या अॅप्सबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेऊन अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरील अनेक अॅप्सबद्दल सरकारकडे तक्रारी आल्या होत्या, असंही मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.
चीनला चोख प्रत्युत्तर! राजनाथ सिंहांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेट नाकारली
याआधी मोदी सरकारनं टिकटॉकसह अनेक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जूनच्या अखेरीस टिकटॉक, हेलोसह ५९ चिनी अॅप्सवर बंदीची कारवाई करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये आणखी ४७ चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सरकारनं पबजीसह लिविक, वीचॅट वर्क, वीचॅट रिडिंग, अॅपलॉक, कॅरम फ्रेंड्स यासारख्या मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे.
पँगाँग सरोवराजवळील सर्व डोंगरांवर भारतीय जवानांचा कब्जा; चिनी सैन्याला पळवून लावलं
गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांत त्या तणावात आणखी भर पडली आहे. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. पँगाँग सरोवराजवळ हा प्रकार घडला. यानंतर ३१ ऑगस्टच्या रात्री पुन्हा एकदा चिनी सैन्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही भारतीय जवानांनी चिनी सैन्याला रोखलं. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
चुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले