माहिती प्रसारण मंत्रालय; मोदी सरकारच्या चार वर्षांमध्ये चार मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 01:34 PM2018-05-15T13:34:52+5:302018-05-15T13:34:52+5:30
गेल्या चार वर्षांच्या काळामध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा पदभार चार नेत्यांकडे देण्यात आलेला आहे.
नवी दिल्ली- काल पुन्हा एकदा भारताला नवे माहिती आणि प्रसारण मंत्री मिळाले आहेत. स्मृती इराणी यांच्याकडे आता केवळ वस्रोद्योग मंत्रालयाचा पदभार ठेवण्यात आला आहे. केंद्रामध्ये 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. 2016 साली त्यांच्याकडचे हे खाते काढून घेण्यात आले व त्याची जबाबदारी प्रकाश जावडेकर यांच्याकडे देण्यात आली. 2016 पासून स्मृती इराणी वस्त्रोद्योग मंत्री झाल्या. भाजपाचे ज्य़ेष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांनी माहिती व प्रसारण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळेस या मंत्रालायचा अतिरिक्त पदभार स्मृती इराणी यांच्याकडे देण्यात आला. आता तो पदभारही काढून घेण्यात आला.
सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यांनी 1946 ते 1947 या काळासाठी त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला. त्यांच्यानंतर तीन वर्षे आर.आर. दिवाकर यांनी ही जबाबदारी सांभाळली. तर बाळकृष्ण विश्वनाथ केसकर हे या खात्याचे पहिले मराठी मंत्री झाले. सर्वाधीक काळ त्यांना या खात्याची जबाबदारी पाहिली आहे.
1952 ते 1962 असे दशकभर त्यांनी मंत्रालय सांभाळले , त्यानंतर सत्यनारायण सिंह यांनी एक वर्षभर या खात्याची जबाबदारी घेतली. 1964 साली इंदिरा गांधी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या खात्याची जबाबदारी सांभाळली होती. 1964 ते 1966 या काळामध्ये त्या खात्याच्या मंत्री होत्या. त्यांच्याप्रमाणे इंद्रकुमार गुजराल सुद्धा 1975 साली माहिती प्रसारण मंत्री होते. इंदिरा गांधी आणि इंदरकुमार गुजराल हे नंतरच्या काळामध्ये भारताचे पंतप्रधानही झाले. चंद्रशेखर पंतप्रधान असताना त्यांनी माहिती प्रसारण मंत्रालय स्वतःकडेच ठेवले होते. केसकर यांच्यानंतर वसंत साठे आणि विठ्ठलराव गाडगीळ या मराठी नेत्यांनी माहिती प्रसारण खात्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणीही माहिती प्रसारण मंत्रालय होते. एच. के. एल भगत, अरुण जेटली, जयपाल रेड्डी यांना या मंत्रालयाची दोन वेळा जबाबदारी मिळाली आहे. लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांनीही या मंत्रालयाचे नेतृत्त्व केले आहे.
2014 साली एनडीएचे सरकार स्थापन झाल्यावर प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती प्रसारण खात्याची जबाबदारी मिळाले. त्यानंतर अरुण जेटली यांनी दोन वर्षांसाठी मंत्रालय सांभाळले. त्यानंतर एका वर्षासाठी व्यंकय्या नायडू माहिती प्रसारण मंत्री झाले. त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याचे निश्चित केल्यावर स्मृती इराणी यांच्याकडे पदभार आला आणि आता काल राजवर्धनसिंह राठोड या मंत्रालयाचे कामकाज पाहतील असा निर्णय घेण्यात आला. बाळकृष्ण केसकर सोडल्यास फार कमी नेत्यांना प्रदीर्घकाळ या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळायला मिळाली आहे. सलग पाच वर्षांची टर्म त्यांच्यानंतर (कोडरदास शाह अपवाद) कोणालाच मिळालेली नाही.