हुंड्यासाठी अल्पवयीन वाग्दत्त वधूला जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:49 AM2019-12-09T01:49:29+5:302019-12-09T01:50:01+5:30
नियोजित पत्नीचे पालक ५० हजार रुपये हुंड्याची सोय करण्यात अपयशी ठरल्यामुळे मुलीला (१७) मुलाने व त्याच्या आईने जाळून ठार मारले.
आगरतळा : नियोजित पत्नीचे पालक ५० हजार रुपये हुंड्याची सोय करण्यात अपयशी ठरल्यामुळे मुलीला (१७) मुलाने व त्याच्या आईने जाळून ठार मारले. दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यात शनिवारी हा प्रकार घडला. ९० टक्के भाजलेल्या मुलीचा येथील जी. पी. पंत रुग्णालयात मृत्यू झाला.
अजोय रुद्र पाल (२१) आणि त्याची आई मिनाती यांना मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली, असे शांती बाझार पोलीस ठाण्याचे प्रभारी नारायण चंद्र साहा यांनी सांगितले. मुलीने आत्महत्या केली, असे पाल याने सांगितले तर त्याचा दावा तिच्या कुटुंबाने अमान्य केला.
पाल हा रोजंदारी कामगार असून त्याला पोलिसांनी ताब्यात घ्यायच्या आधी वार्ताहरांशी बोलताना त्याने सांगितले की, मी दुसऱ्या खोलीत असताना शुक्लाचे किंचाळणे ऐकले. मी गावकऱ्यांच्या मदतीने तिला तेथून वाचवले व तिला रुग्णालयात नेले. मुलीची आई सबिता चौधरी यांनी पालच्या आईने ५० हजार रुपये मागितल्याचे सांगितले.
नेमके काय घडले?
पाल हा शुक्ला चौधरी (रा. खोवाई जिल्हा) हिच्यासोबत २८ आॅक्टोबर रोजी पळून गेला. त्याला ११ डिसेंबर रोजी लग्नाच्या औपचारिकता पूर्ण करायच्या होत्या. तथापि, अजोय पालची आई मुलीच्या पालकांना सहा डिसेंबर रोजी भेटली आणि तिने त्यांच्याकडे ५० हजार रुपये मागितले.
शुक्लाच्या कुटुंबियांनी आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगून १५ हजार रुपये जमा केले. काही तासांनी मुलीला ती ९० टक्के जळाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे साहा यांनी सांगितले.