शाळेला दांडी मारुन मुलाने स्कूटरला उडवलं; स्टंटच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलीची हाडं मोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 11:45 AM2024-08-03T11:45:50+5:302024-08-03T11:55:30+5:30

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून एका महिलेेची हत्या केली.

Minor students hit mother and daughter with car woman dies in Kanpur | शाळेला दांडी मारुन मुलाने स्कूटरला उडवलं; स्टंटच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलीची हाडं मोडली

शाळेला दांडी मारुन मुलाने स्कूटरला उडवलं; स्टंटच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलीची हाडं मोडली

Kanpur Accident : गेल्या काही दिवसांपासून भरधाव गाड्यांमुळे होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. देशभरातून अशा अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कारने स्कूटरला उडवल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी झालीय. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार चालवणारा मुलगा हा अल्पवयीन असल्याचे समोर आलं आहे.

कानपूरच्या किडवाई नगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत स्कूटरवरून जात असलेल्या आई आणि मुलीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी आहे. शाळा बुडवून वडिलांची गाडी घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या हातून ही गंभीर घटना घडली. कारमध्ये दोन मुले आणि दोन मुली होत्या. अल्पवयीन मुलगा कार चालवत स्टंटबाजी करत होता हे व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट झालं आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. कानपूरच्या किडवाई नगर भागात एक महिला तिच्या १२ वर्षीय मुलीला डॉक्टरकडे दाखवून परतत होती. वाटेतच भरधाव वेगात एक कार आली आणि स्कूटरला जोरात धडकली. धडक इतकी जोरदार होती की महिला आणि तिची मुलगी ३० फूट लांब फेकली गेली. आजूबाजूच्या लोकांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र महिलेचा उपचारादम्यान मृत्यू झाला तर मुलीवर उपचार सुरु आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,अपघातग्रस्त गाडीच्या आत पाहिले तेव्हा त्यात दोन मुले आणि दोन मुली होत्या. हे चौघेही अल्पवयीन आणि शालेय विद्यार्थी होते. चौघेही शाळेला दांडी मारुन कारमधून फिरत होते. त्यातील एका मुलाने स्टंट करण्याच्या नादात महिलेला आणि तिच्या मुलीला उडवलं. चौघांनीही शाळेचे कपडे काढून नेहमीचे कपडे घातले. कारमध्ये मुलांचा शाळेचा ड्रेस सापडला आहे. अपघात झाला त्यावेळी कारचा वेग १०० किमी इतका होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कार चालवणाऱ्या मुलाला इतरांसह ताब्यात घेतले.

दुर्दैवी बाब म्हणजे, अपघातात बळी पडलेल्या महिलेने स्कूटर चालताना हेल्मेट घातलं होतं. मात्र कारची धडक इतकी जोरदार होती की,  तिच्या डोक्याला दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे मुलीच्या शरीराची अनेक हाडे तुटली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Minor students hit mother and daughter with car woman dies in Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.