अल्पवयीन आदिवासी मुलीचे एन्काउंटर
By admin | Published: April 16, 2015 02:02 AM2015-04-16T02:02:30+5:302015-04-16T02:02:30+5:30
चार वर्षांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीच्या बनावट चकमक प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी बुधवारी आपल्या २५ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रायपूर : चार वर्षांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीच्या बनावट चकमक प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी बुधवारी आपल्या २५ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मीना खालको या अल्पवयीन आदिवासी मुलीला पोलिसांनी १२ जुलै २०११ रोजी बनावट चकमकीत ठार मारले होते.
या प्रकरणी ११ पोलिसांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये हत्येचा आणि १४ पोलिसांविरुद्ध भादंविच्या कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश अनिता झा यांच्या अध्यक्षतेखालील एस सदस्यीय न्यायिक आयोगाने आपला चौकशी अहवाल सादर केल्याच्या एक आठवड्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. नक्षलवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत मीना मारली गेल्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु त्यांच्या या दाव्यावर आयोगाने गंभीर शंका घेतली आहे.
या चकमकीनंतर प्रचंड जनक्षोभ उफाळला होता. वातावरण तंग झाले होते आणि या घटनेबद्दल प्रचंड रोष होता. त्यामुळे सरकारने हा चौकशी आयोग स्थापन केला होता. तीन वर्षांच्या चौकशीनंतर आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला. (वृत्तसंस्था)