Mirabai Chanu : देशाला रौप्यपदक देणाऱ्या मीराबाईचा भाऊही सैन्यात करतोय देशसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 02:26 PM2021-07-29T14:26:20+5:302021-07-29T14:27:19+5:30
Mirabai Chanu : मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची.
नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आणि मणिपूरची ही कन्या देशाची नायक ठरली. भारतात दाखल होताच तिचे जंगी स्वागत झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राजकारण्यांची सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी तर शाही सोहळ्याचे आयोजन करून मीराबाईचा सत्कार केला. देशासाठी पदक जिंकणाऱ्या मीराबाईचे मोठे बंधु हेही सैन्य दलातून देशसेवा करत आहेत.
मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची. सहा भावंडांतील ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडे ती घेऊन यायची. तिने आणलेली मोळी तिच्या मोठ्या भावांनाही उचलता येत नसे. त्यातीलच, साईखोम सनाटोंबा मैतई हे मीराबाईचे ज्येष्ठ बंधु आहेत. मीराबाईचा ऑलिंपक स्पर्धेतील खेळ पाहण्यासाठी त्यांनी 24 जुलैसाठी अगोदर सुट्टी घेतली होती. मैतई हे सध्या बंगळुरूत राहत असून ते भारतीय सैन्य दलात देशसेवा करत आहेत.
मैतई यांनीच मीराबाईला वेटलिफ्टींगमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच, तिचा ऑलिंपकमधील सामना पाहण्यासाठी ते अतिशय उत्साही होते. कारण, यापूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये मीराबाईला आलेलं अपयश हेही आहे. या अपयशातून अतिशय धैर्याने, संयमाने आणि कष्टाने मीराबाईने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. मैतई यांनीही 2000-2006 या कालावधीत फुटबॉल खेळला आहे. मात्र, घरची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन वयाच्या 17 व्या वर्षीच ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यामुळे, आपले अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मीराबाईला प्रोत्साहन दिले, वेळोवेळी मदत केली.
मीराबाई बनल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक
मणिपूर राज्य सरकारनं मीराबाईला १ कोटी अन् अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा केली. इम्फाळ येथे परतताच तिच्या स्वागताला गाड्यांचा मोठाचा मोठा ताफाच होता. पण, एवढं सगळं वैभव मिळूनही मीराबाईचे पाय आजही जमिनीवर आहेत. त्याची साक्ष देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, रौप्य पदक जिंकून मायदेशी परतल्यानंतर आपल्या भावासोबत त्या जेवण करताना दिसत आहेत.